१२५ फ्रॅक्चर अन् १०८ टाके तरी तो उठला, कामाला लागला आणि यशस्वी झाला!
By दयानंद पाईकराव | Published: August 14, 2023 10:49 AM2023-08-14T10:49:26+5:302023-08-14T10:53:22+5:30
परिस्थिती वाईट असली तरी मनात जिद्द ठेवून खंबीरपणे वाटचाल केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नसते, हे श्रीकांतने जगाला दाखवून दिले
दयानंद पाईकराव
नागपूर : जिद्द मनात असली की कोणतेही काम अशक्य नसते. याची प्रचिती श्रीकांत गंगासागर गुरव या युवकाकडे पाहून येते. त्याला १०८ फ्रॅक्चर आणि १२५ टाके लागले. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याचे ज्वेलरी शॉपही बंद पडले. परंतु खचून न जाता परिस्थितीशी चार हात करीत श्रीकांत पुन्हा उभा झाला. त्याने संसारही सांभाळला आणि आज तो ताठ मानेने उभा ठाकला आहे.
श्रीकांत गंगाधरराव गुरव (४२, रा. हजारी पहाड नागपूर) असे या हरहुन्नरी युवकाचे नाव आहे. एम. ए. सायकॉलॉजी, सायबर लॉमध्ये डिप्लोमा आणि ज्वेलरी मेकिंगचा कोर्स केलेल्या श्रीकांतचे ज्वेलरी शॉप होते. २०१५ मध्ये अश्विनी नावाच्या युवतीशी लग्न झाल्यानंतर पाच महिन्यांतच श्रीकांतचा गंभीर अपघात झाला. त्याला १०८ टाके, १२५ फ्रॅक्चर झाले. तरीही त्याने हिंमत सोडली नाही. जिद्दीने त्याने या अपघातावर मात केली.
दरम्यानच्या काळात त्याची आर्थिक परिस्थिती खराब झाली. ज्वेलरी शॉपचे दुकान बंद पडले. पुढे काय करावे हा प्रश्न होता. शेवटी त्याने सेमिनरी हिल्स परिसरात फूड स्टॉल सुरू केला. या स्टॉलवर तरुणाईला आवडणारे पदार्थ बनवून देणे सुरू केले. अल्पावधीतच त्याचा फूड स्टॉल लोकप्रिय झाला. त्याच्या कामात पत्नी अश्विनीही त्याला मोलाची साथ देत आहे. परिस्थिती वाईट असली तरी मनात जिद्द ठेवून खंबीरपणे वाटचाल केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नसते, हेच श्रीकांतने जगाला दाखवून दिले आहे.
दोन बहिणींचेही व्यवस्थित पालन-पोषण
श्रीकांतला पाच वर्षांची मुलगी आहे. मुलगी सोबत असली म्हणजे त्याला आपला व्यवसाय करणे कठीण होते. अशा वेळी श्रीकांतच्या दोन बहिणी त्याच्या मुलीला सांभाळतात. श्रीकांतची मोठी बहीण ६५ वर्षांची आहे. तर लहान ४५ वर्षांची बहीण दिव्यांग आहे. त्या दोघीही श्रीकांतच्या मुलीला सांभाळतात. हे सर्व लोक एकमेकांना साथ देत असल्यामुळे त्यांच्या संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू आहे.