जन्मांध असूनही गाठले यशोशिखर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 09:10 PM2018-03-20T21:10:46+5:302018-03-20T21:15:28+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक २० पदके-पारितोषिके प्राप्त करण्याचा मान मिळविला. जन्मांध असूनही यशोशिखर खेचून आणणाऱ्या या भगीरथाचे नाव राहुल सुनील बजाज असून, त्याने तरुणांसमोर एक आदर्शच प्रस्थापित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्यात रंग महत्त्वाचे असतात, कारण त्याने आयुष्यही रंगीबेरंगी होते. परंतु नेत्रहीनांच्या जीवनात मात्र एकच रंग असतो. अंधाराचा. पण नेत्रहीनत्व आपल्या प्रगतीचा अडसर ठरून देता दुर्दम्य इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या भरवशावर त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखविण्याचा लहानपणीच संकल्प केला. अडचणी आल्या, ठेचदेखील लागली, परंतु आत्मविश्वास कायम होता. याच भरवशावर त्याने सर्वांना मागे टाकत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक २० पदके-पारितोषिके प्राप्त करण्याचा मान मिळविला आहे. जन्मांध असूनही यशोशिखर खेचून आणणाऱ्या या भगीरथाचे नाव राहुल सुनील बजाज असून, त्याने तरुणांसमोर एक आदर्शच प्रस्थापित केला आहे.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या राहुल बजाज याने ‘एलएलबी’मध्ये (५ वर्षीय अभ्यासक्रम) सर्वात जास्त ‘सीजीपीए’ मिळवत २० पदके व पारितोषिकांवर आपले नाव कोरले आहे. राहुल बजाजचा हा यशोमार्ग सोपा राहिलेला नाही. जन्मापासूनच त्याला दुर्मिळ असा ‘रेटिनल’ आजार असल्याने दृष्टिदोष निर्माण झाला. नेत्रहीन असलेल्या राहुलला अभ्यास करताना अनेक मर्यादांना सामोरे जावे लागले. मात्र वडील डॉ. सुनील बजाज, आई काजल आणि बहीण डॉ. पूजा यांच्या सहकार्याने हे यश मिळविता आले. तंत्रज्ञानाची त्याने योग्य पद्धतीने मदत घेतली व संगणकात वाचून दाखविणाºया ‘सॉफ्टवेअर्स’ च्या माध्यमातूनदेखील अभ्यास केला.
आॅक्सफोर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
नागपूर विद्यापीठात सर्वाधिक पदके-पारितोषिक पटकाविणाऱ्या राहुलने आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नागपूर व देशाचे नाव उंचाविले आहे. अतिशय मानाची मानण्यात येणारी ‘ऱ्होड्स स्कॉलरशीप’ त्याला प्रदान करण्यात आली असून, तो ‘आॅक्सफोर्ड’ विद्यापीठात वर्षभर शिक्षण घेणार आहे. ही शिष्यवृत्ती मिळविणारा राहुल हा देशातील पहिला दिव्यांग ठरला आहे तर नागपूर विद्यापीठातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. जगभरातून केवळ १०० विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.
इच्छाशक्ती आणि मार्गदर्शकांवर विश्वास
सद्यस्थितीत राहुल हा दिल्ली येथे असून, लवकरच तो ‘आॅक्सफोर्ड’ला जाणार आहे. नेत्रहीन असल्यामुळे अभ्यास करणे आव्हानात्मक असते. मात्र इच्छाशक्ती आणि माझ्या मार्गदर्शकांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला विद्यापीठात सर्वाधिक पदके मिळाल्याची माहिती मागील आठवड्यातच मिळाली. ही बाब नक्कीच आनंदित करणारी आहे. परंतु यामुळे माझी जबाबदारीदेखील वाढली आहे, असे राहुलने सांगितले. राहुल हा ‘आयपीआर’ (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ), मानवाधिकार कायदे, संविधानिक कायदे इत्यादींवर लिखाणदेखील करतो.
बारावीतदेखील विभागात आला होता प्रथम
राहुलची गणना अगोदरपासूनच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये होते. बारावीत त्याने वाणिज्य शाखेत ९५ टक्के गुण प्राप्त करत नागपूर विभागात प्रथम येण्याचा मान पटकाविला होता, हे विशेष. दहाव्या वर्गातदेखील त्याने ९७ टक्के गुण प्राप्त केले होते. यश मिळाल्यानंतर संयमितपणे आनंद व्यक्त करण्याचा त्याचा गुण असून, सदैव त्याचे पाय जमिनीवरच असतात.