पराभवानंतरही 'बंटी' जिंकला : नागपूर मध्यची झुंज ठरली लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 09:15 PM2019-10-25T21:15:48+5:302019-10-25T21:17:16+5:30
मध्य नागपूर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश ऊर्फ बंटी शेळके. ‘मध्य नागपूर का बेटा’ चा नारा देत निवडणुकीत उतरलेल्या बंटीचा पराभव झाला असला तरी, त्याने दिलेली झुंज लक्षवेधी ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल गुरुवारी लागले. अनेक उमेदवार विजयी झाले, तर दहा पटीने अधिक उमेदवार पराभूतही झाले. विजयी उमेदवारांना माध्यमांनी उचलून धरले. पण काही पराभूत झालेल्या उमेदवारांचीही दखल माध्यमांना घेणे भाग पडले. अशाच पराभूत उमेदवारांमध्ये आहेत मध्य नागपूर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश ऊर्फ बंटी शेळके. ‘मध्य नागपूर का बेटा’ चा नारा देत निवडणुकीत उतरलेल्या बंटीचा पराभव झाला असला तरी, त्याने दिलेली झुंज लक्षवेधी ठरली. काही मतांनी तो हरला, पण अनेकांची मने मात्र त्याने नक्कीच जिंकली.
काँग्रेस पक्षाच्या शहरातील राजकारणात एक तरुण चेहरा सध्या युवकांमध्ये चर्चेत आहे. शहरातील विविध मतमोजणी केंद्रावर याची प्रचितीही आली. तरुणांमध्ये बंटी शेळकेचे काय झाले याची विचारणा मोठ्या प्रमाणात झाली. बंटी २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेला काँग्रेसचा एक नगरसेवक. त्याचा विजय संघाचे मुख्यालय असलेल्या आणि भाजपाचा गड असलेल्या प्रभागातून झाला. या प्रभागात तीन भाजपाचे तर बंटीच्या रुपात एकमेव काँग्रेस नगरसेवक विजयी झाला. नगरसेवक बनण्यापूर्वीही बंटीच्या रुपात एक उत्साही कार्यकर्ता होता. अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे तो चांगलाच चर्चेत आला. आंदोलन आणि समाजकार्याच्या माध्यमातून तो सदैव चर्चेत राहत होता. नगरसेवक झाल्यानंतरही त्याने जनसामान्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली. उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला जेरीस आणले. मनपातील सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली. त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरुद्ध केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले.
युवक काँग्रेसच्या माध्यमातून बंटीने काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख बनविली. आॅल इंडिया काँग्रेस कमिटीच्या युवा सेलने पक्षाकडे मध्य नागपुरातून बंटीसाठी फिल्डींग लावली. मध्य नागपुरात काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणात बंटी वरचढ दिसला. त्यामुळे काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांना बंटीला उमेदवारी देणे भाग पडले. बंटीच्या विरोधात भाजपचे दोन टर्मचे आमदार विकास कुंभारे होते. बंटीला निवडणुकीत पक्षाकडून अपेक्षित असे सहकार्य मिळाले नाही. मात्र त्याचा जनसंपर्क दांडगा होता. युवकांनी त्याला उचलून धरले होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारादरम्यान तो घरोघरी पोहचला.
युवकांचे जत्थे त्याच्या प्रचारात दिसायचे. लहान्यांशी हस्तांदोलन, समवयस्कांची गळाभेट तर ज्येष्ठांच्या पाया पडत प्रचार सुरू ठेवला. त्याची ही शैली अनेकांना भावली. त्यामुळे या नवख्या पोराने निवडणुकीत चुरस निर्माण केली. बंटी मात्र पक्षातील ज्येष्ठांकडून तसेच आर्थिक बाबतीत उपेक्षित ठरला. त्याला वरिष्ठांची साथ आणि पक्षाकडून आर्थिक रसद पुरविली असती तर, काँग्रेसने दहा वर्षानंतर परत ‘मध्य’ साधला असता.
मध्य नागपूरच्या बाबतीत हलबा आणि मुस्लीम उमेदवारच विजयी होऊ शकतो, असा समज आहे. हा समजही बंटीने मोडून काढला. विशेष म्हणजे निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही बंटी शुक्रवारी पुन्हा जनसंपर्कात व्यस्त झाला. पराभवानंतरही त्याने घरोघरी जाऊन मतदारांचे आभार मानले.