४० कोटी खर्च करूनही अनेक रस्त्यांवर अंधार
By admin | Published: September 13, 2015 02:50 AM2015-09-13T02:50:18+5:302015-09-13T02:50:18+5:30
पथदिव्याच्या देखभाल दुरुस्तीला पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ देत यावर ६ कोटी ७८ लाखाचा खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
कंत्राटदाराला मुदतवाढ : २६ हजार एलईडी केव्हा बसणार
नागपूर : पथदिव्याच्या देखभाल दुरुस्तीला पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ देत यावर ६ कोटी ७८ लाखाचा खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गेल्या तीन वर्षात पथदिव्यांवर ४० कोटीचा खर्च करूनही शहरातील अनेक रस्त्यावर रात्रीला अंधार असूनही ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामासाठी पैसे नाही. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. असे असे असतांना रस्त्यावरील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.
विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात कंत्राटदाराकडून किती पथदिवे दुरुस्त करण्यात आले याची माहिती मनपाच्या विद्युत विभागाकडे नाही. स्थायी समितीलाही याची माहिती देण्यात आलेली नाही. असे असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
शहरात १ लाख २६ हजारांवर पथदिवे आहेत. रात्रीच्या सुमारास यामुळे वाहनचालकांना मदत होते. यातील २६ हजार पथदिवे एलईडी करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र अद्याप ५० टक्केही एलईडी दिवे बसलेले नाही. पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्षाचे कंत्राट देण्यात आले होते.
३० सप्टेंबरला याची मुदत संपत असल्याने पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. वायर बदलणे व इतर कामासाठी वेगळा खर्च असल्याचे विभागातील अधिकाऱ्यानी सांगितले. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)
अनेक रस्त्यावर अंधार
गेल्या तीन वर्षात पथदिव्यावर ४० कोटीचा खर्च करण्यात आला. परंतु झिंगाबाई टाकळी मार्ग, तेलंखेडी मार्ग, मानेवाडा रिंगरोड, लालगोदाम मार्ग, तसेच दक्षिण अंबाझरी मार्गावरील रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे.