प्रक्रिया प्रकल्प असूनसुद्धा उपराजधानीत तब्बल ११६.५० एमएलडी सांडपाणी जाते वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 08:10 AM2022-12-06T08:10:00+5:302022-12-06T08:10:01+5:30
नागपूर शहरात दररोज निघणाऱ्या ५२० एमएलडीपैकी सुमारे ११६.५० एमएलडी सांडपाणी वाहून जात आहे.
नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नद्यांमधून बोटी चालविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी २०१३ पासून प्रयत्न सुरू आहेत. नदीतील पाणी स्वच्छ व्हावे म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यानंतरही शहरात दररोज निघणाऱ्या ५२० एमएलडीपैकी सुमारे ११६.५० एमएलडी सांडपाणी वाहून जात आहे. त्यामुळे नागनदी स्वच्छतेचा खटाटोपाला अर्थच राहिलेला नसल्याचे दिसतेय.
नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात दररोज सुमारे ५२० एमएलडी सांडपाणी निर्माण होत आहे. यापैकी नागपूर महापालिका आणि नागपूर सुधार प्रण्यास मिळून ४०३.५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करते. परंतु प्रक्रिया न केलेले सांडपाणी कुठे जाते याची कल्पना किंवा नोंद महापालिकेकडे नाही, अशी माहिती महापालिकेने माहितीच्या अधिकारात पर्यावरणप्रेमी संजय अग्रवाल यांना दिली आहे. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डने महापालिकेला नोटीस बजावून प्रक्रिया न झालेले पाणी कन्हान नदीत सोडले जात असल्याने आक्षेप घेतला आहे. प्रक्रिया न केलेले पाणी नदीत न सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाचा हा अवमान आहे.
- येथे होते सांडपाण्यावर प्रक्रिया
महापालिकेचे वॉटर ट्रीटमेंट प्लॅण्ट
भांडेवाडीमध्ये - ३३० एमएलडी
मानकापूरमध्ये - ५ एमएलडी
मोक्षधाम येथे - ५ एमएलडी
- नागपूर सुधार प्रन्यासचे प्लॅण्ट
काचीमेट - १ एमएलडी
सोनेगाव - ०.३ एमएलडी
हजारी पहाड - ४ एमएलडी
अंबाझरी - ३.२ एमएलडी
दाभा - ५ एमएलडी
सोमलवाडा १ - २० एमएलडी
सोमलवाडा २ - २० एमएलडी
वांजरा - १० एमएलडी
- मोक्षधामचा प्रकल्प बंद
मोक्षधाम घाटावर लावण्यात आलेला वॉटर ट्रीटमेंट प्लॅण्टमध्ये ५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होत असल्याचे महापालिका सांगत असली तरी, हा प्रकल्प बऱ्याच दिवसापासून बंद आहे. हा प्रकल्प चालविणारा कंत्राटदाराचा कंत्राट संपल्यामुळे नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
- शहरातून निघालेले सांडपाणी ज्यावर प्रक्रिया होत नाही, ते सरळ नदीला मिळत असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. ग्रामीण जनता या नदीचे पाणी पिण्यास उपयोग करीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. हा प्रकार न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा आहे.
संजय अग्रवाल, पर्यावरणप्रेमी
- पुन्हा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे तीन प्रकल्प प्रस्तावित
१) नरसाळा येथे पोहरा नदीवर २० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प निर्माण होणार आहे. त्याची देखभाल दुरुस्ती स्मार्ट सिटी नागपूर करणार आहे.
२) अमृत योजनेंतर्गत शहरातील दक्षिण सिवेरेज झोनमध्ये ३५ एमएलडी प्रक्रिया केंद्र प्रस्तावित आहे.
३) नाग नदी उत्थान प्रकल्पांतर्गत ९२ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केंद्र प्रस्तावित आहे.
- महापालिकेने शहरातून दररोज ५२० एमएलडी सांडपाणी निघत असल्याचे सांगितले असले तरी, त्याचे प्रमाण जास्त आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प वाढविल्यानंतरही नदीचे प्रदूषण संपणारे नाही. त्यामुळे घराघरातून यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
प्रद्युन्य सहस्त्रभोजनी, पर्यावरणतज्ज्ञ