धमक्या मिळाल्या तरी लेखनावर निष्ठा असली पाहिजे : अरुणा सबाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:46 PM2020-02-08T23:46:22+5:302020-02-08T23:49:46+5:30
आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वेगगेवळ्या विषयावर लेखन सोपे राहिले नाही. असे वास्तववादी लेखन केले तर धमक्या यायला लागतात. मात्र लेखकांनी त्याला भीक न घालता धडाडीचे आणि वास्तवादी लेखन केले पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वेगगेवळ्या विषयावर लेखन सोपे राहिले नाही. असे वास्तववादी लेखन केले तर धमक्या यायला लागतात. मात्र लेखकांनी त्याला भीक न घालता धडाडीचे आणि वास्तवादी लेखन केले पाहिजे. किती धमक्या आल्या तरी आपल्या लेखनावर निष्ठा असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक अरुणा सबाने यांनी व्यक्त केले.
पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित वार्षिक साहित्य संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, विजया ब्राम्हणकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. अरुणा सबाने पुढे बोलताना म्हणाल्या, प्रत्येकाची लेखनाची शैली, धाटणी व त्याचा पोत वेगळा असतो. अनेकदा त्या लेखनावर होणारी टीका त्यांना सहन होत नाही. मात्र आपण काय लिहितो आणि कशासाठी लिहितो याचे आत्मपरीक्षण लेखकांनीच करण्याची गरज आहे. स्वत:ला विचारणा केली पाहिजे. त्यातून अनेकदा दर्जेदार लेखन निर्मिती होत असते. मुळात लेखन करणे इतके सोपे नाही आणि जे आपण लिहितो आणि त्यावर टीका झाली तर आपण ते सहन करीत नाही. मुळात लेखन हा रियाज आहे. जेवढे लेखन कराल तेवढी आपली लेखणी आणि भाषा समृद्ध होईल. त्यासाठी विविध वाङ्मय लेखन करताना त्याकडे गंभीरपणे बघितले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमादरम्यान मालिनी राजाभाऊ बोबडे सामाजिक पुरस्कार कवी बळवंत भोयर व विजया मारोतकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संगीता वाईकर यांनी केले. कार्यक्रमात सतीशकुमार पाटील (कोल्हापूर), निर्मलकुमार सूर्यवंशी (नांदेड), अरुण नाईक (गोवा), जयश्री उपाध्ये (नागपूर), परिणिता कवठेकर, आ.य. पवार (जामखेड), ज्योत्स्ना चांदगुडे (पुणे), श्रुती वडगबाळकर (कोेल्हापूर), डॉ. संभाजी पाटील (लातूर), संगीता अरबुने (वसई), डॉ. गणेश चव्हाण (नागपूर), गणेश भाकरे (सावनेर) डॉ. वर्षा सगदेव (नागपूर), शामल कामत (मुंबई) यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद््घाटनानंतर ज्येष्ठ कवयित्री कविता शनवारे यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात अनेक कवींनी सहभाग घेत दर्जेदार कविता सादर केल्या.