वाघाचे ‘पगमार्क’तरीही मुरूम उत्खननाचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:26+5:302021-05-28T04:07:26+5:30
शरद मिरे भिवापूर : अभयारण्याला अगदी लागून जंगलप्रभावित भागात मुरुमाचे नियमबाह्य उत्खनन सुरू आहे. अशातच गुरुवारी (दि. २७) उत्खननाच्या ...
शरद मिरे
भिवापूर : अभयारण्याला अगदी लागून जंगलप्रभावित भागात मुरुमाचे नियमबाह्य उत्खनन सुरू आहे. अशातच गुरुवारी (दि. २७) उत्खननाच्या २० खोल खड्ड्यात वाघासह त्याच्या बछड्यांचे ‘पगमार्क’ आढळल्याने वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उठले आहे. प्रचंड प्रमाणात सुरू असलेल्या उत्खननामुळे वन्य प्राण्यांनी आपला मुक्तसंचार थांबवायचा काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
भिवापूर परिसरात नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरमाची आवश्यकता आहे. तालुक्याबाहेरून मुरूम आणल्यास ट्रान्सपोर्टिंगचा खर्च मोठा येतो. त्यामुळे ब्रॉडगेज निर्मातादार कंत्राटदाराने लगतच्या परिसरातूनच मुरूम उत्खननाचा उपद्व्याप सुरू केला आहे. उमरेड-भिवापूर-आमगावपर्यंतचा ब्रॉडगेज मार्ग अभयारण्याला अगदी लागून आहे. याच अभयारण्य प्रभावित भागात मुरूम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने मुरूम उत्खननासाठी जंगल प्रभावित भागातून अवैध मुरूम उत्खननाचा सपाटा चालविला आहे. प्राप्त परवानगी आणि प्रत्यक्षात उत्खननाचे दृश्य यात नियम पायदळी तुडविल्या जात आहे.
नगरपंचायत प्रभाग क्र. २ अंतर्गत भूदान ही १०० लोकसंख्येची वस्ती शहरापासून ३ किमी अंतरावर आहे. संपूर्ण वस्ती अभयारण्याने प्रभावित आहे. याच भुदान परिसरात जंगलापासून अगदी १५ फूट अंतरावर प्रचंड प्रमाणात मुरूम उत्खनन सुरू आहे. आतापर्यंत १ हजारावर टिप्परवर मुरूम नेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास प्रस्तुत प्रतिनिधीने ‘ऑन दि स्पॉट’ पाहणी केली असता, उत्खननाच्या खड्ड्यात वाघ व एका बछड्याचे पगमार्क आढळले. अभयारण्य प्रभावित भूदानमध्ये वाघ, बिबट व इतर वन्यप्राण्यांचा नियमित मुक्तसंचार असतो. अशात जंगलव्याप्त भागात सुरू असलेले हे मुरूम उत्खनन वन्यप्राण्यांच्या जीवावर उठण्याची भीती व्यक्त होत आहे.
वाघ अन् बछडे पाणी प्यायला आले?
भूदानमधील मुरूम उत्खननाचा परिसर पाच ते सहा एकर आहे. आतापर्यंत एकरभर जागेत २० फूट खोल हजारावर टिप्पर मुरूम उत्खनन करण्यात आला आहे. दरम्यान, उत्खननात झरा लागल्याने खड्ड्यात पाणी जमा होत आहे. हेच पाणी पिण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाघ व एक बछडा आला असावा. खड्ड्यासह संपूर्ण परिसरात वाघ व बछड्याचे सुमारे पन्नासवर पगमार्क उमटले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या उत्खननाच्या खड्ड्यात पाणी साचून वन्य प्राण्याचे जीव धोक्यात येणार आहे.
--
दोन खसऱ्यामध्ये मुरूम उत्खननाबाबत प्रस्ताव आले होते. यासोबत वनविभागाचे प्रमाणपत्रसुद्धा आहे. प्राप्त कागदपत्रांच्या आधारावर पाचशे ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी देण्यात आली. उत्खननादरम्यान नियमांचे पालन करावे. अशा सूचनाही परवानगी पत्रातून उत्खननकर्त्यास दिल्या आहे. उत्खननस्थळाची पाहणी करण्यात येईल.
- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार, भिवापूर
--
उत्खनन सुरू असलेली जागा वन्य जीव विभागाची नाही. मात्र उत्खनन वन्य जीव परिसरास लागून असल्यास परवानगी देताना वन्य जीव विभागाची हरकत, नाहरकत घेतली जाते. अद्याप तरी असला कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही.
- आर.बी. निंबेकर, वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)
--
छायाचित्रातील पगमार्क वाघाचेच आहे. उत्खनन सुरू असलेली जागा प्रादेशिक वन विभागाची नाही. मात्र उत्खननाला लागून प्रादेशिकची जागा असल्यास परवानगी देताना प्रादेशिक वन विभागाची हरकत, ना हरकरत घेतली जाते. मात्र अद्याप तरी अशा प्रकारचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. पगमार्क आढळलेल्या स्थळाला भेट देऊन पाहणी करू.
- वैष्णवी जरे, वन परिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक)