साटक, ढवळपेठ शिवारातील दारूभट्ट्या नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:53+5:302021-09-07T04:11:53+5:30
रामटेक/बुटीबाेरी : पाेळ्याच्या पार्श्वभूमीवर दारूविक्रीत वाढ हाेत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध माेहीम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गत ...
रामटेक/बुटीबाेरी : पाेळ्याच्या पार्श्वभूमीवर दारूविक्रीत वाढ हाेत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध माेहीम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील साटक व बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ढवळपेठ शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्ट्या धाडी टाकून नष्ट केल्या. या दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण तीन लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रविवारी (दि. ५) रामटेक परिसरात गस्तीवर असताना त्यांना साटक, ता. पारशिवनी शिवारात माेहफुलाची दारूभट्टी असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी पाहणी केली. त्यांना शेतालगतच्या नाल्याजवळ दारूभट्टी आढळून येताच धाड टाकली. यात त्यांनी रामा देवचंद कुंभलकर (३०, रा. साटक, ता. पारशिवनी) यास ताब्यात घेत दारूभट्टी नष्ट केली. या कारवाईमध्ये तीन लाेखंडी शेगड्या, एक गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, १,७९० लिटर माेहफुलाचा सडवा, ७५ लिटर माेहफुलाची दारू असा एकूण दोन लाख बारा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने साेमवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे ढवळपेठ शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात त्यांनी आकाश वाघमारे, रा. ढवळपेठ, ता. नागपूर ग्रामीण यास ताब्यात घेतले व दारूभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईमध्ये १,४०० लिटर माेहफुलाचा सडवा, ५० लिटर माेहफुलाची दारू, दारू काढण्याचे साहित्य असा एकूण एक लाख ५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या दाेन्ही प्रकरणात रामटेक व बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, सहाय्यक फाैजदार साहेबराव बहाळे, पाेलीस नायक उमेश फुलबेल, विपीन गायधने, अमाेल वाघ, राेहन डाखाेरे, गजेंद्र चाैधरी, महेश जाधव, रामा आडे, अमृत किनगे, बालाजी साखरे यांच्या पथकाने केली.