आठ हजार हेक्टरमधील साेयाबीन उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:12 AM2021-09-14T04:12:20+5:302021-09-14T04:12:20+5:30
अभय लांजेवार लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यात १३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील ८,८०० हेक्टर मधील साेयाबीनचे पीक ...
अभय लांजेवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यात १३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील ८,८०० हेक्टर मधील साेयाबीनचे पीक उद्ध्वस्त हाेण्याच्या मार्गावर आहे. हा फटका साेयाबीनच्या लवकर येणाऱ्या वाणाला (अर्ली व्हरायटी) सर्वाधिक बसला आहे. त्यातच प्रतिकूल वातावरणामुळे पिकावर झालेल्या राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट हाेण्याची शक्यताही बळावली आहे.
चालू खरीप हंगामात उमरेड तालुक्यातील १७ हजार हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी १० जूनच्या आधीच साेयाबीनची पेरणी केली असून, अनेकांनी ९० दिवसात येणाऱ्या जेएस-२०३४, जेएस-९५६०, विक्रांत व तत्सम अर्ली व्हरायटीच्या वाणाला पसंती दिली. जून महिन्यात मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने काही पेरण्याही खाेळंबल्या हाेत्या.
सुरुवातीच्या अनुकूल व नंतरच्या प्रतिकूल वातावरणामुळे साेयाबीनच्या पिकावर राेग व किडींचा प्रादुर्भाव झाला. मात्र, शेतकऱ्यांनी सवड मिळताच याेग्य नियाेजन करीत तण साेबतच राेग व किडींवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे साेयाबीनचे पीक आजवर उत्तम दिसत हाेते. अर्ली व्हरायटीच्या वाणाच्या शेंगा परिपक्व हाेण्याच्या काळात सलग १३ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. याच काळात शेंगा पक्व हाेत असताना झाडांची पाने पिवळी पडायला सुरुवात हाेते.
सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तसेच जमिनीत पाण्याचा याेग्य निचरा हाेत नसल्याने या शेंगा झाडालाच काळवंडत आहेत. पाऊस आणखी आठवडाभर कायम राहिल्यास तसेच जमीन काेरडी न झाल्यास या शेंगामधील परिपक्व दाण्यांना अंकुर फुटण्याची व अपरिपक्व दाणे काळे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साेयाबीनची अर्ली व्हरायटी वापरणारे बहुतांश शेतकरी संकटात सापडले आहे.
...
लेट व्हरायटी सुस्थितीत
काही शेतकऱ्यांनी ११० दिवसांत येणाऱ्या लेट व्हरायटीच्या साेयाबीनची पेरणी केली असून, काहींनी अर्ली व्हरायटीचा वापर करीत उशिरा पेरणी केली. लेट व्हरायटी साेबतच उशिरा पेरणी केलेल्या अर्ली व्हरायटीच्या साेयाबीन पिकाची स्थिती सध्यातरी चांगली आहे. या पिकांची पाने अद्याप हिरवीगार असून, फलधारणा व्हायला सुरुवात झाली आहे. या काळात काेसळणाऱ्या पावसाचा या पिकावर फारसा विपरित परिणाम हाेणार नाही, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
...
पावसामुळे कापणीत खाेळंबा
काही शिवारातील अर्ली व्हरायटीच्या वाणाच्या शेंगा परिपक्व झाल्या असून, पीक कापणीच्या अवस्थेत आहे. सततच्या पावसामुळे पीक कापणी करणे शक्य नाही. पाऊस दमट वातावरणामुळे शेंगामधील दाणे अंकुरण्याची शक्यता बळावली आहे. अशा स्थितीत पिकाची कापणी केली तरी उन्हामुळे शेंगा फुटण्याची व नुकसान हाेण्याची शक्यता आहे, असेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.
...
रेकॉर्ड ब्रेक पाऊस
उमरेड तालुक्यात १ जूनपासून ते १३ सप्टेंबर या काळात ७४४.७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ऑगस्टपर्यंत ५९६.९३ मिमी पाऊस काेसळला हाेता. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढला. १ ते १३ सप्टेंबर यात काळात १४७.८२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. हा १३ दिवसातील रेकाॅर्ड ब्रेक पाऊस असल्याची माहिती महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.