उद्ध्वस्त भविष्याची किंमत ३२० रुपये
By admin | Published: April 24, 2017 02:09 AM2017-04-24T02:09:11+5:302017-04-24T02:09:11+5:30
माणसाची खासकरून महिला-मुलीची अब्रू मानवी जीवापेक्षाही जास्त अमूल्य मानली जाते.
दोघे १०० रुपयात तर दोघे २२० रुपयात गप्प : पापाचे बनले भागीदार
नरेश डोंगरे नागपूर
माणसाची खासकरून महिला-मुलीची अब्रू मानवी जीवापेक्षाही जास्त अमूल्य मानली जाते. एखादवेळी शरीराचा एखादा अवयव माणूस दान करू शकतो, बदलवूही शकतो, मात्र महिलेची अब्रू एकदा गेली की पर्यायच संपतो. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला, त्याच्यावर हल्ला झाला तर त्याला पुढचे अनेक दिवस त्या जखमांच्या वेदना होतात. मात्र, एखाद्या महिला, मुलीची अब्रू लुटली गेली तर ती महिला-मुलगी मरेपर्यंतचा प्रत्येक क्षण न सोसवणाऱ्या वेदना घेऊन जगत असते. त्याचमुळे महिला-मुलीच्या बाबतीत तिच्या जीवापेक्षाही अमूल्य तिची इज्जत मानली जाते. दुर्दैवी तन्वी(काल्पनिक नाव)च्या अब्रूचा सौदा मात्र फक्त ३२० रुपयात झाला. स्वत:ला माणूस म्हणून घेणाऱ्या नराधमांनी ३२० रुपये फेकून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. भयंकर म्हणजे, केवळ ३२० रुपयांसाठी चार नराधमांनी आपल्या मनोमस्तिष्कावर झापडं लावून तिची अब्रू लुटणाऱ्या नराधमांची पाठराखण केली. या ३२० रुपयात कुणाचा वाटा ५० रुपये, कुणाचा १०० तर कुणाचा ११० रुपये आहे.
माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार सीताबर्डीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतून पुढे आला आहे. आॅटोचालक चिंट्याच्या मदतीने तन्वीला १०० रुपयात जेवण घेऊन देण्याचे आमिष दाखवून सामूहिक बलात्काराचा कट रचणारा फिरोज पाच मुलींचा बाप आहे. त्याची सर्वात लहान मुलगी केवळ सहा महिन्यांची आहे.
तन्वी त्याच्या मुलीसारखीच आहे. मात्र, दुष्प्रवृत्तीच्या फिरोजने तन्वीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट रचला अन् यासाठी त्याने चिंट्या, मयूर आणि बाबा नामक साथीदारांची मदत घेतली. एकटी, निराधार आणि असहाय मुलगी पाहून हे नराधमही कुकर्मात सहभागी झाले. त्याहीपेक्षा भयंकर आहे, पुढचा टप्पा!
फिरोज आणि बाबाने आरोपी प्रलय मेश्राम तसेच सौमिल मेश्रामला फोन केला. ‘शिकार ला रहे है, गद्दीया (गाद्या) लाके रखो. तुम्हारे लिये बीअर भी ला रहा हूं’ असे म्हटले. ते ऐकताच प्रलय आणि सौमिलने गाद्यांची व्यवस्था केली. निर्माणाधीन इमारतीत गेल्यानंतर तेथील चौकीदार साखरे बावाजी (वय ७०) याने ‘मेरा क्या... असा प्रश्न केला.
आरोपींनी त्याच्या खिशात ५० ची नोट कोंबली आणि त्याने सदनिकेचे दार उघडून दिले. हे पाहून बाजूच्या इमारतीत चौकीदारी करणारा सुरेश भारसाकळे (वय ६०) आला. त्यानेही भुवया उंचावल्या. नराधमांनी त्याच्याही हातात ५० ची नोट कोंबली. तोही बाजूला झाला. अवघ्या १०० रुपयांसाठी हे दोघे तन्वीच्या आक्रोशाचे मूक साक्षीदार (पापाचे भागीदार) बनले. तर, २२० रुपयांच्या बीअरसाठी प्रलय आणि सौमिलने आपल्या संवेदना विकल्या. चार नराधम तन्वीचे आयुष्य उद्ध्वस्त करीत असताना हे दोघे बीअरचे घोट रिचवत दाराजवळ पडून होते. साखरे, भारसाकळे, प्रलय तसेच सौमिल या चौघांना किंवा त्यांच्यातील एकालाही स्वत:ची लाज वाटली नाही. नराधमांना विरोध करण्याची त्यांची वृत्ती नव्हतीच. मात्र पोलिसांना १ रुपयाचा फोन करण्याचीही तसदी त्यानी घेतली नाही. एका निराधार मुलीच्या इज्जतीचा एक प्रकारे त्यांनी सौदाच केला. हे करताना त्यांना कसलीही आत्मग्लानी झाली नाही. परिणामी लहानपणापासून पोरकेपणा तिरस्कार सहन करणाऱ्या तन्वीच्या वाट्याला आता अंध:कारमय भविष्य आले आहे.
सारेच कसे संतापजनक
सुरक्षा रक्षक म्हणवून घेणाऱ्या साखरे अन् भारसाकळेला तन्वीच्या वयाच्या नाती असाव्यात. ६०-७० उन्हाळे, पावसाळे बघून चांगले काय, वाईट काय याचा अनुभव घेणाऱ्या या दोघांनी अवघ्या ५० रुपयांसाठी आपल्या पिकल्या केसांना काळे फासावे तसे स्वत:च्या मनालाही काळे फासले. त्यांच्या तुलनेत प्रलय आणि सौमिलचेही वर्तन प्रचंड संतापजनक आहे. हे दोघेही शिकले सवरले आहेत. प्रलय अभियंता असून, मोठ्या पगारावर झारखंडमध्ये नोकरी करतो तर, सौमिल एका सिमेंट कंपनीत कार्यरत आहे. असे असूनही त्यांनी केवळ एका बीअरच्या बाटलीसाठी स्वत:ची बुद्धी नराधमांकडे गहाण टाकली.