वैज्ञानिकांशी केली विस्तृत चर्चा
By admin | Published: October 27, 2014 12:29 AM2014-10-27T00:29:55+5:302014-10-27T00:29:55+5:30
उमा भारती यांनी ‘नीरी’ला दिलेल्या भेटीदरम्यान वैज्ञानिकांकडून आणखी कुठल्या मुद्यांचा समावेश होऊ शकतो यासंदर्भात निरनिराळ्या बाबी जाणून घेतल्या. ‘एन्व्हायर्नमेन्टल जीनोमिक्स डिव्हीजन’चे
नागपूर : उमा भारती यांनी ‘नीरी’ला दिलेल्या भेटीदरम्यान वैज्ञानिकांकडून आणखी कुठल्या मुद्यांचा समावेश होऊ शकतो यासंदर्भात निरनिराळ्या बाबी जाणून घेतल्या. ‘एन्व्हायर्नमेन्टल जीनोमिक्स डिव्हीजन’चे प्रमुख डॉ.हेमंत पुरोहित यांनी उमा भारती यांचे स्वागत केले.
‘वॉटर टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेन्ट डिव्हीजन’चे प्रमुख डॉ.पवनकुमार लाभसेटवार यांनी गंगा पुनरुज्जीवनासंदर्भात ‘नीरी’ने प्रस्तावित केलेल्या बाबींचे सादरीकरण केले. ‘क्लिनर टेक्नॉलॉजी सेंटर’चे प्रमुख डॉ.राजेश बिनीवाले यांनी उमा भारती यांना ‘मिशन क्लीन गंगा’मध्ये उपयुक्त ठरू शकणाऱ्या ‘फायटोरिड’ सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञानासंदर्भात माहिती दिली. उमा भारती यांनी या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली हे विशेष.
गोसेखुर्दला जीवदान
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना उमा भारती यांनी विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखूर्द प्रकल्पाबाबतदेखील मत व्यक्त केले. केंद्र सरकार गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाला लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे. याकरिता आवश्यक निधी उपलब्ध व्हावा हा मुद्दा लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विदर्भासोबतच महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्राला फायदा होईल असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
नाग नदीचे ‘मिशन’ गडकरींकडे
उपराजधानीतील नाग नदीच्या पुनरुज्जीवनाचे काय यासंदर्भात उमा भारती यांना विचारणा केली असता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी जबाबदारी घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडकरी हे ज्येष्ठ मंत्री आहेत व त्यांनी नाग नदीला स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली आहे तर ते ती पूर्ण करूनच दाखवतील, असा विश्वास उमा भारती यांनी व्यक्त केला. उमा भारती यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली.