तलावांना प्रदूषणाचा विळखा
By admin | Published: October 20, 2015 03:38 AM2015-10-20T03:38:20+5:302015-10-20T03:38:20+5:30
तलावाचे शहर म्हणून नागपूरचा नावलौकिक आहे. भोसलेकालीन हे तलाव नागपूरचा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु
नागपूर : तलावाचे शहर म्हणून नागपूरचा नावलौकिक आहे. भोसलेकालीन हे तलाव नागपूरचा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु तलावांच्या वैभवाला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. आजच्या घडीला शहरातील संपूर्ण तलाव प्रदूषित झाले असून, तलावातील आॅक्सिजनची मात्रा कमी झाली असून गढुळपणा वाढला आहे. त्याचा परिणाम तलावातील जलचरावर होत आहे. तलावाच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणामुळे तलावाचे क्षेत्रफळ कमी होत आहे. सौंदर्यीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याचे आराखडे तयार करणाऱ्या प्रशासनाचे तलावांचे अस्तित्व टिकविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. उपराजधानीला स्मार्ट लूक द्यायचा असेल तर या तलावांचाही चेहरामोहरा बदलणे आवश्यक आहे. नागपूर महापालिकेच्या हद्दीत अंबाझरी, गोरेवाडा, फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, नाईक तलाव, डोब तलाव व लेंडी तलाव आहेत. भोसल्यांच्या काळात या तलावांची निर्मिती झालेली आहे. कधीकाळी हे तलाव सभोवतालच्या वस्त्यांचे पाणीपुरवठ्याचे साधन होते. शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत पाणी पुरवठ्याच्या सोयी प्रशासनाने केल्यामुळे तलावांचे महत्व काळानुरूप कमी होत गेले.
त्यामुळे हे तलाव शोभेच्या वस्तू बनले. सध्या शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत तलावांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सोनेगाव तलाव, लेंडी तलाव, पांढराबोडी, सक्करदरा या तलावाच्या जागेवर लोकांनी अतिक्रमण करून निवारा मिळविला. त्यामुळे तलावांचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. तलाव प्रदूषित होण्याला सर्वात मोठे कारण गणेश आणि दुर्गा उत्सवात मूर्तीचे होणारे विसर्जन आहे.
त्याचबरोब तलावाच्या सभोवतालच्या वस्त्यांचे सांडपाणी व घाण तलावात सोडली जाते. कितीही आवाहने केली तरी निर्माल्य, कचरा तलावात फेकण्यात येतो, विशेष म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाचा उपसा कित्येक वर्षांपासून झालेला नाही. मूर्ती विसर्जनामुळे तलाव प्रदूषित होत आहेत. विशेषत: प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलस्रोत नष्ट होत आहेत.
तलावांचे घटते क्षेत्रफळ
तलाव क्षेत्र (चौरस किमी)
गोरेवाडा १.०१
अंबाझरी १.१८
फुटाळा ०.४
सोनेगाव ०.१५
सक्करदरा ०.१०
गांधीसागर ०.१८
लेंडी तलाव ०.०४
नाईक तलाव ०.०३
डोब तलाव ०.०२