तोतलाडोह गोळीबाराची एसडीएम करणार चौकशी
By admin | Published: March 20, 2015 02:25 AM2015-03-20T02:25:57+5:302015-03-20T02:25:57+5:30
पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तोतलाडोह परिसरातील जलाशयात झालेल्या गोळीबार प्रकरणाची चौकशी ...
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तोतलाडोह परिसरातील जलाशयात झालेल्या गोळीबार प्रकरणाची चौकशी रामटेकचे उपविभागीय अधिकारी(एसडीएम) शेखर सिंह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
२३ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तोतलाडोह परिसरातील जलाशयात काही लोक अवैध मासेमारी करीत होते. दरम्यान तिथे पोहचलेल्या वन कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत एका मासेमाराचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बराच वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यासंदर्भात पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व प्रकल्प संचालक यांनी २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना पत्र लिहिले.
या पत्राची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. याची चौकशी रामटेकचे उपविभागीय अधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. २७ मार्चपर्यंत ते यासंबंधीची माहिती एकत्रित करतील. गोळीबाराचे कारण, तिथली परिस्थिती, बंदुकीच्या गोळीचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला किंवा नाही, याबाबत ते चौकशी करतील. (प्रतिनिधी)