तोतया अधिकारी गजाआड
By Admin | Published: October 3, 2015 03:01 AM2015-10-03T03:01:52+5:302015-10-03T03:01:52+5:30
अट्टल वाहनचोराला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ३१ दुचाकी जप्त करण्याची प्रशंसनीय कामगिरी कोतवाली पोलिसांनी बजावली. दीपक दत्तूजी व्यास (वय ३७) असे आरोपीचे नाव आहे.
अट्टल वाहनचोर ३१ वाहने जप्त कोतवाली पोलिसांची कामगिरी
नागपूर : अट्टल वाहनचोराला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ३१ दुचाकी जप्त करण्याची प्रशंसनीय कामगिरी कोतवाली पोलिसांनी बजावली. दीपक दत्तूजी व्यास (वय ३७) असे आरोपीचे नाव आहे.
तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील काम्पा (नागभीड) येथील रहिवासी आहे. त्याने नंदनवनमध्ये आपली दुकानदारी सुरू केली होती. कोतवालीचे पोलीस पथक २६ सप्टेंबरला बडकस चौकाजवळ गस्तीवर असताना त्यांनी संशयास्पद वर्तनावरून दीपकला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
दीपक दिवसाआड दुचाकी चोरायचा. ओळखीच्यांना एका कंपनीचा फायनान्स अधिकारी म्हणून स्वत:ची ओळख देत होता. कंपनीने दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी आपण जप्त केलेले वाहन विकत असल्याचे सांगून, तो चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावत होता. त्याने अशाप्रकारे अनेक वाहने विकली.
काही दिवसांपूर्वी त्याने गणेशोत्सवाच्या गर्दीची संधी साधून चितारओळीतून एक प्लेझर चोरली. बडकस चौकाजवळच्या एका बोळीत दोन पोलीस दिसल्याने त्याने ही मोटरसायकल तेथेच ठेवली आणि निघून गेला. २६ सप्टेंबरच्या रात्री ती दुचाकी घेण्यासाठी तो तेथे आला आणि पीएसआय सुधीर बोरकुटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्याकडून ७ लाख ७० हजारांच्या ३१ दुचाकी जप्त केल्या. ठाणेदार सुरेश भोयर, द्वितीय निरीक्षक खुशाल तिजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी सुधीर बोरकुटे, सचिन धर्मेजवार, शैलेंद्र वैरागडे, विनायक आसटकर, सुनील मडावी, शेखर समुद्रे, संदेश शुक्ला, छत्रपाल चैधरी, निशांत कराडे, मनोज ढोले, प्रसन्नजित जांभुळकर, सागर खाणंदे, संजय परमार यांनी ही कामगिरी बजावली. (प्रतिनिधी)