दवभिजल्या संध्याकाळी बहरली ‘उत्तररात्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:29 PM2018-03-16T23:29:37+5:302018-03-16T23:30:08+5:30
अमृताच्या अंकुरण्याविषयी सांगत ती कुठल्याशा स्वप्नफुलाशी येऊन थांबते. वाटते...ती पोहोचलीय समेवर. पण, कुठले काय...तो केवळ भास असतो हलत्या सावल्यांचा. ती आणखी पुढे सांगत सुटते युगायुगांच्या अक्षर यात्रेची गाथा. रॉय किणीकरांच्या शब्दांची हीच गाथा डॉ. शाम माधव धोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारच्या दवभिजल्या संध्याकाळी ऐकवली अन् १२९ कडव्यांचा हा अविट तराना पुढचे १ तास २० मिनिट नुसता झंकारात राहिला श्रोत्यांच्या मनामनात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तररात्र...ही खरं तर जीवनाच्या क्षणभंगुर स्वरूपाचे वास्तव सांगणारी कविता. पण, तिचा प्रारंभ प्रचंड आशादायी. प्रणयाच्या उन्मत हिंदोळ्यावर झुलणारा. अमृताच्या अंकुरण्याविषयी सांगत ती कुठल्याशा स्वप्नफुलाशी येऊन थांबते. वाटते...ती पोहोचलीय समेवर. पण, कुठले काय...तो केवळ भास असतो हलत्या सावल्यांचा. ती आणखी पुढे सांगत सुटते युगायुगांच्या अक्षर यात्रेची गाथा. रॉय किणीकरांच्या शब्दांची हीच गाथा डॉ. शाम माधव धोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारच्या दवभिजल्या संध्याकाळी ऐकवली अन् १२९ कडव्यांचा हा अविट तराना पुढचे १ तास २० मिनिट नुसता झंकारात राहिला श्रोत्यांच्या मनामनात. इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजतर्फे हॉटेल सेंंटर पॉर्इंट येथे आयोजित व सृजन निर्मित या काव्यवाचनाचा प्रारंभ डॉ. वैशाली उपाध्ये यांच्या गोड आवाजात झाला. ‘हा देह तुझा पण देहातील तू कोण, हा देह तुझा पण देहाविण तू कोण...?’ या प्रश्नाने पहिल्याच मिनिटाला अंतर्मुख केले. ‘राहिले तिथे ते तसेच अपुरे चित्र, राहिले तिथे ते तसेच अपुरे पत्र, घटिपात्र बुडाले, कलंडला नि:श्वास, पाखरू उडाले, पडला उलटा फास...’ असे पे्रम आणि विरहाचे हे चित्र मांडत ही कविता पुढे सरकते अन् थेट सतत जाणवणारा मृत्यू, अनिश्चितता, हतबलता, नियतीचे वर्चस्व यांचे भयाण वास्तव सांगायला लागते. विचारातील विविधता, अनिश्चितता आणि अर्थाचे हेलकावे वाचकाला स्वस्थता लाभू देत नाहीत. विचारचक्र गरगरत राहते. शेवटाकडे जाताना ही कविता सांगते...‘पण लिहावयाचे लिहून झाले नाही,पण सांगायचे सांगून झाले नाही,संपली कथा जी कुणी ऐकली नाही,संपली रात्र, वेदना संपली नाही...’ ही कविता जिथे संपते तिथे श्रोत्यांची अवस्था वावटळीत अडकल्यासारखी होते. लाख प्रयत्नाअंतीही अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोचत नाहीत. पण, परतताना या कवितेने आपल्या पदरात काहीतरी टाकलेय खरं याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असते. याचे श्रेय अर्थातच डॉ. शाम माधव धोंड यांना आणि त्यांच्या कल्पनेला वास्तवाचे पंख प्रदान करणाऱ्या डॉ. वैशाली उपाध्ये, अरविंद उपाध्ये आणि शैलेश दाणी यांनाही.