देवा कधी रे देशील दर्शन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:52+5:302021-06-23T04:06:52+5:30
- देवस्थाने अजूनही कुलूपबंद : भक्तांच्या भावना काळजातच दडल्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाने धास्तावलेल्या सरकारने नागरिकांच्या ...
- देवस्थाने अजूनही कुलूपबंद : भक्तांच्या भावना काळजातच दडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाने धास्तावलेल्या सरकारने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने टाळेबंदी घोषित केली. या घोषणेत देवस्थानांना सर्वप्रथम सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने गेल्या १५-१६ महिन्यात तब्बल १२ महिने देवस्थाने कुलूपबंद आहेत. पुजारी नैमित्तिक विधी-विधाने करत आहे. पंचकमेटीचे पदाधिकारी-सदस्य देवळात येत आहेत. मात्र, ज्यांच्या भरवशावर देवळात देव असल्याची जाणिव होते, ते भक्त दर्शनापासून वंचित आहेत. राज्य शासनाने संक्रमणाच्या दृष्टीने जे जिल्हे वर्ग १ मध्ये येत आहेत, तेथे टप्प्याटप्प्यात अनलॉक जाहीर केले. नागपुरात सर्व गोष्टींना मुभा दिलेली आहे. मात्र, ती मुभा अजूनही धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला नाही. या दोन्ही क्षेत्रांवरील टाळेबंदी अजूनही जारीच आहे. भक्त मात्र आपले नवस, आपल्या भावनिक घोषणा देवळात जाऊन पूर्ण करण्याची प्रतीक्षा करत आहेत.
--------
पूजासामुग्री, हार फुल विक्रेत्यांची दुकाने सामसूम
कोणत्याही देवस्थानांचा विचार केला असता, तेथे पूजासामुग्री, हार-फुल विक्रेत्यांची दुकाने सजलेली असतात. एकंदर या देवस्थानात येणाऱ्या भक्त मंडळींवर यांची रोजीरोटी चालते. मात्र, सरकारी आदेशानुसार देवळेच कुलूपबंद आहेत आणि भक्तांना येण्यास मज्जाव आहे. अशा स्थितीत हे दुकानदार संकटात सापडले आहेत. दुकाने सामसूम आहेत. देवाचे कपाट पुन्हा उघडावे आणि पुन्हा तिच जुनी गजबज रमावी आणि दुकानदारांच्या घरच्या चुली पुन्हा आनंदाने प्रज्वलित व्हाव्या अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------
देवस्थानांचा खर्च व्यवस्थापनाला भागवेना
देवस्थानांचा खर्च भक्तांच्या दानक्षिणेवर अवलंबून असतो. त्यामुळे साहजिकच गेल्या १५-१६ महिन्यात लागू झालेल्या दोन टाळेबंदीत मंदिरांच्या व्यवस्थापनाची पार वाट लागलीब आहे. पुजारी, कर्मचारी, स्वच्छता दूत, कंत्राटी कर्मचारी यांचा पगार देणे कठीण झाले आहे.
-------
मंदिरावरील टाळेबंदी लवकर उठावी
श्री टेकडी गणेश मंदिरात ८ पुजारी आणि १४ कर्मचारी आहेत. इतर अन्य कंत्राटी कर्मचारीही आहेत. टाळेबंदीमुळे भक्त येत नाहीत आणि दानदक्षिणा येत नाही. त्यामुळे व्यवस्थापन चालविणे कठीण झाले आहे. तरी देखील कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही कधीच अडवले नाही आणि कुणाला कमी केलेले नाही. सरकारने देवस्थानांवरील टाळेबंदी लवकर उठवावी, ही अपेक्षा आहे.
- संजय जोगळेकर, सचिव : श्री टेकडी गणेश मंदिर, नागपूर
-------
आत नाही तर बाहेरूनच दर्शन घेऊ
गेल्या वर्षभरापासून आम्ही शेगावला गेलो नाही. आता तर वाटते की गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाऊनच यावे. बाहेरून दर्शन मिळाले तरी चालेल.
- कोमल दिवटे, भक्त
-----
बाप्पाच्या दर्शनाची ओढ लागली आहे
विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या टेकडी गणेशाचे दर्शन कधी होईल, असे वाटते आहे. विनंती केली तर दर्शन होईलही. मात्र, काही विधी विधान करायचे आहेत. त्यासाठी अनलॉक होणे गरजेचे आहे.
- गजानन जैस, भक्त
......