२५ वर्षांच्या अनुभवातून विकास साधणार
By admin | Published: July 26, 2016 02:25 AM2016-07-26T02:25:32+5:302016-07-26T02:25:32+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कायम अधिष्ठाता म्हणून डॉ. मीनाक्षी वाहणे यांची वर्णी लागली आहे.
मेयोच्या अधिष्ठातापदी मीनाक्षी वाहणे
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कायम अधिष्ठाता म्हणून डॉ. मीनाक्षी वाहणे यांची वर्णी लागली आहे. सोमवारी सकाळी त्या ‘आॅर्डर’ घेऊनच मेयोत आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. वैद्यकीय सेवेच्या २५ वर्षांच्या अनुभवातून मेयोचा विकास साधणार, अशी कुबली त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
डॉ. मीनाक्षी वाहणे (गजभिये) या मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांनी १९८१ मध्ये मेयो येथूनच एमबीबीएसचे शिक्षण घेतले. आंबेजोगाई मेडिकल येथून ‘रेडिओलॉजी’ या विषयात एमडीचे शिक्षण पूर्ण केले. येथेच त्यांनी सुरुवातीला सहायक प्राध्यापक आणि नंतर सहयोगी प्राध्यापक म्हणून १२ वर्षे काम पाहिले. नंतर त्यांची बदली यवतमाळ, नागपूर, अकोला, पुणे आणि मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये झाली. येथे त्या रेडिओलॉजीच्या विभागप्रमुख होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची निवड झाल्याने त्यांचा अधिष्ठाता पदाचा मार्ग मोकळा झाला.
मेयोचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांची पदोन्नती झाल्यानंतर डॉ. मधुकर परचंड हे प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात मेयोच्या विकासात हातभार लावला. दरम्यानच्या काळात डॉ. परचंड यांच्याकडे कायम अधिष्ठाता पदाची सूत्रे येणार असल्याचे बोलले जात होते. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागात खातेपालट होताच हा बदल झाल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. यात आमदार डॉ. मिलिंद माने यांचा मोठा हातभार लागल्याचे समजते.(प्रतिनिधी)
मेयोचा दर्जा सुधारणार
डॉ. मीनाक्षी वाहणे म्हणाल्या, ‘मेयो’च्या विकासात अनेक अडथळे आहेत. परंतु २५ वर्षांचा अनुभव व कौशल्याचा वापर करीत ते दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य व तत्काळ उपचार मिळणे हा त्याचा हक्क आहे. तो मिळाल्यास त्या रुग्णालयाची प्रगती होते, असा माझा समज आहे. यामुळे त्यादृष्टीनेही प्रयत्न होणार आहे. गेल्या काही वर्षांत गरिबांचे रुग्णालय म्हणून शासकीय रुग्णालयांची ओळख निर्माण झाली आहे. मेयोबाबत ही ओळख पुसून काढण्यासाठी मध्यमवर्गीयांसोबतच श्रीमंत रुग्णही येथे उपचारांसाठी येतील, यासाठी रुणालयाचा दर्जा वाढविण्याला प्राधान्य दिले जाईल. मेडिकल कॉलेजचे प्रथम उद्दिष्ट हे चांगले डॉक्टर घडविणे हे आहे. मेयोचा विचार केल्यास येथे ‘एमआरआय’ नसतानाही विद्यार्थी रेडिओलॉजीचे उच्चशिक्षण घेत आहेत. या सारख्या अनेक प्रश्नांचे निराकरण करून विद्यार्थ्यांना सोई उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न राहणार आहे.