शालेय विद्यार्थ्यांसाठी गोल्फ मैदान विकसित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:12+5:302020-12-22T04:08:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅकजवळील जागेवर गोल्फ ग्राऊंड विकसित करण्यात यावे. यामुळे शहरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅकजवळील जागेवर गोल्फ ग्राऊंड विकसित करण्यात यावे. यामुळे शहरातील शालेय खेळाडूंना सुविधा उपलब्ध होऊन राज्य तसेच राष्ट्रीय गोल्फर निर्माण होतील, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी येथे केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर उपस्थित होते.
क्रीडा संकुलातील सुरू असलेली कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी. ४०० मीटरचा ॲथ्लेटिक रनिंग ट्रॅक आणि युथ होस्टेलचे काम ताबडतोब पूर्ण करण्यात यावे. तसेच क्रीडा संकुल समितीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वसतिगृहाचे नूतनीकरण व दुरुस्ती याबाबत दोन कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून ते त्वरित पूर्ण करण्यात यावे. यासोबतच हरपूर येथील कामगार कल्याण विभागाचे अर्धवट अवस्थेतील क्रीडा संकुल पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश केदार यांनी दिले.
बॉक्स
१५ ऐवजी ३० वर्षांचा भाडेपट्टा
विभागीय क्रीडा संकुलाची भाडेपट्ट्याची मुदत २०१५ मध्ये संपली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ वर्षांसाठी भाडेपट्टा मिळण्याबाबतचा प्रस्ताव महसूल व वनविभाग यांच्याकडे नूतनीकरणासाठी पाठविला आहे. यात १५ वर्षांऐवजी ३० वर्षांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठवा, असे केदार यांनी यावेळी सांगितले.