एकात्मतेच्या आधारावर राष्ट्र विकास व्हावा
By Admin | Published: October 19, 2015 03:04 AM2015-10-19T03:04:13+5:302015-10-19T03:04:13+5:30
आजच्या काळात जात, भाषा, प्रांत यांच्यातील भेदभाव दूर सारून सर्व समाजाने एकत्रितपणे राहण्याची गरज आहे.
शांताक्का : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी महोत्सव साजरा
नागपूर : आजच्या काळात जात, भाषा, प्रांत यांच्यातील भेदभाव दूर सारून सर्व समाजाने एकत्रितपणे राहण्याची गरज आहे. देश प्रगतीकडे अग्रेसर असून एकात्मतेच्या आधारावरच राष्ट्राचा विकास व्हावा, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा रविवारी सायंकाळी झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
गोरक्षणजवळील लक्ष्मी सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ अधिवक्ता अॅड. मोनिका अरोरा या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या आजच्या काळात ज्ञानासोबतच योग्य संस्कारांची आवश्यकता आहे. पुढील पिढी व समाजामध्ये नैतिकतेचा भाव वाढावा यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा, असे शांताक्का म्हणाल्या. महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची आवश्यकता आहे. इंटरनेट तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला म्हणजे भोगवस्तू असेच दाखविण्यात येते. केंद्राने अशा ८०० संकेतस्थळांवर बंदी आणली होती.
परंतु त्याला विरोध झाला. योग्य नेतृत्वाला समाजाचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. तरच योग्य दिशेने देशाचा विकास होऊ शकतो, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या सोहळ्याला नागपुरातील निरनिराळ्या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती. शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर सेविकांनी दाखविलेल्या खड्गाच्या प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. या कार्यक्रमाला समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, स्वामिनी ब्रह्मप्रकाशानंदाजी, अ.भा.सह शारीरिकप्रमुख मनिषा संत, महानगर कार्यवाहिका करुणा साठे या उपस्थित होत्या. मेधा नांदेडकर यांनी संचालन केले.या सोहळ्याचे ‘यु ट्यूब’ तसेच वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. (प्रतिनिधी)
किस रावण की भुजा उखाडू
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अॅड. मोनिका अरोरा यांनीदेखील सेविकांना मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांकडे आजदेखील उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते हे फारच दुर्दैवी आहे. समाजात सुशिक्षित असुरांची संख्या वाढते आहे. या असुरांना वठणीवर आणण्याचे काम महिलाच करू शकतात, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून युवतींमध्ये शक्तीचे बीजारोपण केले जात आहे व खऱ्या अर्थाने आज हे एक ‘शक्तीपीठ’ झाले आहे. प्रत्येक महिलेने मी अबला नाही तर सबला आहे असाच विचार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.