पर्यटनस्थळासारखा पुलांचा विकास करा
By admin | Published: July 9, 2017 01:51 AM2017-07-09T01:51:31+5:302017-07-09T01:51:31+5:30
पुलांचे बांधकाम करताना पुलांची डिझाईन अत्यंत आकर्षक असावी आणि ते बघण्यास सुंदर असल्यास
चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रतिपादन : आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेला सुरु वात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलांचे बांधकाम करताना पुलांची डिझाईन अत्यंत आकर्षक असावी आणि ते बघण्यास सुंदर असल्यास पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित करण्याच्या दृष्टीने पुलांची निर्मिती करावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शनिवारी येथे केले. नागपुरात आयोजित आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले. या परिषदेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी क्षेत्रातील ४५० प्रतिनिधी उपस्थित आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, आयएडीएसईचे चेअरमन डी.ओ. तायडे, सचिव आय. के. पांडे, मुख्य अभियंता ए. के. बॅनर्जी, केंद्रीय रस्ते विकास विभागाचे विभागीय अधिकारी एम. चंद्रशेखर तसेच प्रकल्प संचालक, राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बांधकामाच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सावित्री नदीवरील पुरामुळे वाहून गेलेला पूल बांधण्यासाठी १८० दिवसांची मुदत दिली होती. परंतु हा पूल १६५ दिवसातच पूर्ण करण्यात आला असल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, स्थापत्याच्या दृष्टीने पूल हा सुंदरच असायला हवा, तसेच टिकाऊसुद्धा राहील याकडे लक्ष देताना पुलाच्या सुंदरतेबद्दल पर्यटकसुद्धा आकर्षित व्हावेत यादृष्टीने तंत्रज्ञानाच्या विकासासाठी या परिषदेत विचारमंथन व्हावे.
इंडियन नॅशनल ग्रुप आॅफ आयएबीएसई यांच्यातर्फेआयोजित आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या सत्रात पुलांच्या अभियांत्रिकीसंदर्भात प्रा. महेश टंडन, अलोक भौमिक, मॉरगान टोलॅण्ड, दीपक सिंगला, एस.पी. खेडेकर, आशुतोष चंदावार, इर्विन व्हिसॅट, उमेश राजेशिलके तसेच डॉ. बी.सी. रॉय आदींनी मार्गदर्शन केले.