‘कॅग’च्या प्रश्नांचे सेझच्या विकास आयुक्तांकडे उत्तर नाही!
By मोरेश्वर मानापुरे | Published: November 16, 2023 08:46 PM2023-11-16T20:46:47+5:302023-11-16T20:48:32+5:30
‘मिहान-सेझ’मध्ये ४८० एकर जमिनीच्या वापसीसह अनेक प्रश्न अनुत्तरीत
नागपूर: मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राचे (एसईझेड) विकास आयुक्त डॉ. व्ही. श्रमण हे कॅगने उपस्थित केलेल्या प्रश्नांना आतापर्यंत उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांना उत्तर देण्यासाठी दोनदा वेळ देण्यात आली होती. त्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. यामध्ये सेझमध्ये एलओएविना (लेटर ऑफ अॅग्रिमेंट) असलेल्या १५३.१६१ एकर जमिनीचे वितरण आणि ही जमीन पुन्हा वापस न घेण्यासंदर्भातील प्रश्न गंभीर आहेत.
कामात अत्यंत संथ असलेल्या मिहान-सेझची विकासक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) उत्तर मिळविण्यात अयशस्वी ठरलेल्या सेझच्या विकास आयुक्तांनी दोन आठवड्याआधी एमएडीसीला कारणे दाखवा नोटीस जारी केला होता. सेझमध्ये एलओएविना आणि ज्यांचे एलओए रद्द झाले आहे, अशा कंपन्यांची जमीन परत का घेण्यात आली नाही आणि केव्हापर्यंत परत घेण्यात येईल, असे प्रश्न नोटीसात विचारले आहेत.
कॅगच्या ऑडिटनंतर सेझच्या विकास आयुक्तांनी ४८० एकर जमिनीसंदर्भात एमएडीसीला १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. आयुक्तांकडून यासंदर्भात एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालकांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. कॅगला उत्तर देण्याची वेळ निघून गेल्यानंतर विकास आयुक्तांनी दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावताना १५ दिवसांत उत्तर देण्याचा उल्लेख केला होता. शिवाय सर्व कंपन्यांची अमानत रक्कम जप्त का करण्यात आली नाही आणि जमीन वितरणाचे निर्धारित मानकांशी जुळलेले प्रश्न विचारण्यात आले होते.
१५ वर्षांपासून सुरक्षा भिंतीचे काम अपूर्ण
मिहानच्या एसईझेड परिसराच्या दोन भागात गेल्या १५ वर्षांपासून सुरक्षा भिंत बांधण्यात आलेली नाही. तसे पाहता हा भाग विशेष आहे, पण सुरक्षा भिंत नाही. शिवाय अतिकमण आहे आणि या परिसरात पाळीव प्राण्यांचा वावर कसा, यावरही एमएडीसी अनुत्तरीत आहे.