प्रतिभेची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:28 AM2019-09-03T00:28:14+5:302019-09-03T00:30:15+5:30

समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.

The development of a community is hampered that does not care about talent | प्रतिभेची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो 

कवयित्री सीमा सलीमखॉं पठान हिला डॉ. सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार प्रदान करताना प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जुल्फी शेख, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, डावीकडून रेखा दंडिगे-घिया, मो. सलीम शेख, डॉ. मोहम्मद असदुल्लाह, प्रकाश कुळकर्णी, निलेश खांडेकर

Next
ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : सीमा सलीमखाँ पठाण यांना सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार प्रदान

लोकमत  न्यूज  नेटवर्क  
नागपूर : समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्या वतीने विदर्भातील ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील सीमा सलीमखाँ पठाण यांना शंकरनगरच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात डॉ. सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखिका डॉ. जुल्फी शेख, डॉ. मोहम्मद असदुल्लाह, प्रकाश कुळकर्णी, नीलेश खांडेकर उपस्थित होते. डॉ. जुल्फी शेख म्हणाल्या, समाजातील लहान व्यक्तींना पुढे आणून त्यांना संधी देणे हे गिरीश गांधी यांचे महत्त्वाचे काम आहे. सीमाला आकाशाएवढे होण्याची हिंमत त्यांनीच दिली. ज्याच्यात स्फूर्ती आहे, तोच जीवनातील चढ-उतार काव्यातून पकडू शकतो. त्यासाठी गुरूचे अधिष्ठान मानावे लागते. कवितेला समजणे आवश्यक आहे. सुलभा हेर्लेकर यांनी मुक्त रचना केल्या. ज्याच्या हृदयात कळ नाही, पेटून उठण्याचा वणवा नाही तो कविता करूच शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, सुलभा हेर्लेकर मोठ्या मनाच्या कवयित्री होत्या. त्यांनी आपल्यासोबतच्या कवयित्रींचे कौतुक तर केलेच, परंतु नवोदितांनाही संधी देण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांच्या नावाचा पुरस्कार नवोदित कवींना देण्याचे ठरले. सीमाने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सुलभा हेर्लेकर, जुल्फी शेख यांचा आदर्श पुढे ठेवून वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. मोहम्मद असदुल्लाह यांनी प्रतिभावंतांची समाजाने दखल घेण्याची गरज असल्याचे सांगून, गिरीश गांधी यांच्या कार्याचे कौतुक केले. सीमा पठाणने आपल्या विचारांना शब्दाचे रूप देऊन साहित्याच्या क्षेत्रात पदार्पण केल्याचे सांगून, तिच्या कामगिरीचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना सीमा पठाण यांनी मोहम्मद असदुल्लाह यांनी हिंमत दिल्यामुळे पुढे येऊ शकल्याचे सांगून, गिरीश गांधी यांच्यामुळे नवी दिशा मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मो. सलीम शेख यांनी केले. संचालन आणि आभारप्रदर्शन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.

Web Title: The development of a community is hampered that does not care about talent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर