एकत्रित प्रयत्नांतूनच वनवासी क्षेत्राचा विकास

By admin | Published: April 11, 2016 03:15 AM2016-04-11T03:15:49+5:302016-04-11T03:15:49+5:30

नि:स्वार्थ भावनेने सांघिकरीत्या काम करणे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती आहे. वनवासी क्षेत्राचा अन् पर्यायाने

Development of forest area through joint efforts | एकत्रित प्रयत्नांतूनच वनवासी क्षेत्राचा विकास

एकत्रित प्रयत्नांतूनच वनवासी क्षेत्राचा विकास

Next

राजेश लोया : वनवासी कृषी ग्रामविकास कार्यकर्त्यांच्या संमेलनाचा समारोप
नागपूर : नि:स्वार्थ भावनेने सांघिकरीत्या काम करणे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती आहे. वनवासी क्षेत्राचा अन् पर्यायाने देशाचा सर्वांगीण विकास याच विचारांतून होऊ शकतो. एखादे ज्ञान आत्मसात केल्यानंतर परोपकारी वृत्तीने त्याचा प्रसार करून गरजूंना त्याबाबत प्रशिक्षण दिले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया यांनी व्यक्त केले. पुण्यातील सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित वनवासी कृषी ग्रामविकास कार्यकर्त्यांच्या त्रैवार्षिक संमेलनाची शनिवारी सांगता झाली. यावेळी ते बोलत होते.
रेशीमबाग स्मृति मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, सुयश ट्रस्टचे प्रमुख य.गो.घैसास व स्मिता घैसास उपस्थित होते. वनवासी कृषी ग्रामविकास कार्यकर्त्यांच्या संमेलनात कृषीसंदर्भातील विविध प्रयोगांबाबत विचार मांडण्यात आले आहेत. येथे आलेल्या कार्यकर्त्यांनी हे विचार आपापल्या प्रांतामध्ये पोहोचवावेत.
एकत्रित प्रयत्नांतूनच वनवासी क्षेत्राचा विकास शक्य आहे, असे लोया म्हणाले. कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण आवश्यक आहे. परंतु त्याचे पाश्चात्त्यकरण होता कामा नये. शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल याबाबत विचार करायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी सिंचनात चांगले पीक कसे येईल याबाबत संशोधन करण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केले. सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून १३६ गावांमध्ये वनवासी लोकांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे. ग्रामीण भागात कृषी विषयाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मोहन घैसास यांनी केले. त्यांनी या संमेलनाचा आढावादेखील मांडला. सुयश चॅरिटेबल ट्रस्टकडून गेल्या ३५ वर्षांपासून आधुनिक व जैविक कृषी विकासाच्या माध्यमातून वनवासी समाजाला सक्षम बनविण्याचे कार्य करण्यात येत आहे.
या संमेलनात आधुनिक कृषी प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या संमेलनात विदर्भ, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमधील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संचालन प्रदीप कुंटे यांनी केले तर स्मिता घैसास यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Development of forest area through joint efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.