राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरच्या संपूर्ण विकास : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:22 PM2019-03-06T22:22:01+5:302019-03-06T22:22:44+5:30
नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीमुळे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विकासासाठी ३१.१५ कोटींचा निधी दिला असून राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरचा संपूर्ण विकास केला जाईल. तसेच नागपुरातील लालस्कूलच्या जागेवर अत्याधुनिक ई-लायब्ररी उभारण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीमुळे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विकासासाठी ३१.१५ कोटींचा निधी दिला असून राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरचा संपूर्ण विकास केला जाईल. तसेच नागपुरातील लालस्कूलच्या जागेवर अत्याधुनिक ई-लायब्ररी उभारण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
गीतांजली चौक ते गांधीसागर मार्ग डी.पी. रोडचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थायी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, माजी महापौर प्रवीण दटके, अर्चना डेहनकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बंडू राऊ त आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी ई-लायब्ररीला मंजुरी देत असल्याची घोषणा केली. याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे निवडणूक आचारसंहितेपूर्वी पाठविण्याचे निर्देश महापालिकेला दिले. यासाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. नागपूर शहराने विकासाची क्रांती केली आहे. २१ व्या शतकातील आधुनिक शहर होत आहे. विकासाचा लाभ सर्वस्तरातील लोकांना होईल. लोकांना विश्वासात घेऊ न विकास केला जाईल. लोक म्हणायचे पश्चिम नागपूरचा विकास होत आहे. परंतु आता मध्य व पूर्व नागपूर विकासामुळे पूर्णपणे बदललेले बघयाला मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी प्रस्ताविकातून नवीन डी.पी.रोडसाठी १४ कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. यातील ४.६२ कोटीतून १८ मीटरचा रस्ता तर ९ कोटींचा निधी पुनर्वसनावर खर्च केला जाणार आहे.
एम्प्रेस मॉलच्या जागेवर गारमेंट झोन उभारणार: नितीन गडकरी
एम्पे्रस मॉलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारमेंट झोन उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध केला जाईल. यातून १० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
इंटिग्रेटेड गारमेंटची निविदा काढण्यात आली आहे. नागपूर शहरात ७० हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत. गांधीसागर तलावाच्या विकासासाठी ३१ कोटी दिले. शहराच्या विकासासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारनेही निधी उपलब्ध केला. मध्य नागपुरातील अरुंद रस्त्यांमुळे त्रास होतो. याचा विचार करता मेयो हॉस्पिटल ते भंडारा रोड, केळीबाग रोड यासह सहा रस्त्यांची कामे होत आहेत. रस्त्यांमुळे बाधित होणाऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल. जमीन अधिग्रहणासाठी ४५० कोटींचा निधी दिल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.