बुद्धीचा विकास कोणत्याही औषधाने होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:27 PM2018-12-17T12:27:39+5:302018-12-17T12:28:42+5:30
बुद्धीचा विकास कोणत्याही औषधामुळे होत नाही. बुद्धी जेवढी वापरली जाईल, तेवढी ती तीक्ष्ण होत जाते, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुद्धीचा विकास कोणत्याही औषधामुळे होत नाही. बुद्धी जेवढी वापरली जाईल, तेवढी ती तीक्ष्ण होत जाते, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.
इंडियन अकॅडेमी आॅफ न्यूरॉलॉजीच्यावतीने आयोजित ‘नॅशनल ब्रेन वीक’चे रविवारी अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते तज्ज्ञ वक्ते म्हणून बोलत होते. अन्य तज्ज्ञ वक्त्यांमध्ये डॉ. सुधीर भावे, डॉ. नितीन चांडक व डॉ. पौर्णिमा करंदीकर यांचा समावेश होता. हा कार्यक्रम आयटी पार्कमधील पर्सिटंट सभागृहात झाला. मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्यावर व्यक्तीचे वर्तमान व भविष्य अवलंबून असते. त्यामुळे मेंदूची सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे. चांगला आहार घेणे, वाचन करणे, शब्दकोडे सोडविणे, नवनवीन गोष्टी शिकणे, छंद बाळगणे, सकारात्मक विचारसरणी या बाबींमुळे मेंदूचा विकास होतो. दारू, तंबाखू, जंकफूड, धुम्रपान, टीव्ही, मोबाईल, तणाव या गोष्टी मेंदूकरिता धोकादायक आहेत असे मेश्राम यांनी पुढे बोलताना सांगितले.
डोकेदुखीचे दोन भाग केले जातात. एका भागामध्ये अर्धशिशी, तणावामुळे होणारी डोके दुखी इत्यादीचा तर, दुसऱ्या भागामध्ये ब्रेनट्युमरसारख्या गंभीर आजारांचा समावेश होतो. देशातील १५ टक्के नागरिकांना अर्धशिशीचा त्रास आहे. जीवनात प्रथमच व अचानक डोकेदुखी सुरू होणे धोकादायक आहे. अशावेळी तात्काळ आवश्यक तपासण्या केल्या पाहिजे असे डॉ. चांडक यांनी सांगितले.
मेंदूमधील सर्व पेशी आपापल्या जबाबदाºया योग्य पद्धतीने पार पाडत असेपर्यंत घाबरण्याचे काहीच कारण नसते. परंतु, एकाही पेशीने स्वत:ची जबाबदारी अमान्य करून दुसºया पेशींच्या कामात लुडबुड केल्यास समस्या निर्माण होतात अशी माहिती डॉ. करंदीकर यांनी दिली.
मेंदूच्या आजाराची लक्षणे स्पष्टपणे दिसून येतात. आजारी व्यक्तीच्या वागण्याबोलण्यात फरक दिसून येतो. अशावेळी तत्काळ उपचार करून घेतले पाहिजे याकडे डॉ. भावे यांनी लक्ष वेधले.
ठाकरे यांनी अकॅडेमीच्या उपक्रमांची प्रशंसा केली. अकॅडेमीच्या उपक्रमांमुळे नागपूरकरांचे जीवन समृद्ध झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आॅस्कर पुरस्कार मिळालेला मेंदूच्या प्रभावशालीतेवर आधारित ‘रेन मॅन’ हा चित्रपट सादर करण्यात आला व ‘नॅशनल ब्रेन वीक’ पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सुपंथा भट्टाचार्य यांनी चित्रपटाचे समीक्षण केले.