स्मार्ट सिटीच्या स्वप्नात विकासच हरवला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:52+5:302021-09-05T04:11:52+5:30
रस्ते, नाल्यासह मूलभूत सुविधांची कामे ठप्पच : जागोजागी चिखल अन् पाणी साचून लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील ...
रस्ते, नाल्यासह मूलभूत सुविधांची कामे ठप्पच : जागोजागी चिखल अन् पाणी साचून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या भरवशावर अनेकांनी आपले राजकारण केले. नागरिकांना मोठमोठी स्वप्ने दाखविली. मात्र प्रकल्पाची अवस्था आज वाईट आहे. स्मार्ट सिटीत समावेश असल्याने महापालिकेनेही या भागाला वाऱ्यावर सोडले आहे. स्मार्ट सिटीच्या स्वप्नात या भागाचा विकासच हरवला आहे.
‘स्मार्ट सिटी मिशन’तर्फे शहरांच्या प्रगतीचे नियमित मूल्यमापन होत असते. या कागदावरील खेळात नागपूरची आघाडी दिसत असली तरी वास्तव वेगळेच आहे. क्षेत्राधिष्ठित विकास या घटकाखाली पारडी-भरतवाडा-पुनापूर-भांडेवाडी परिसरातील १७३० एकर भागाचा विकास होईल, असे स्वप्न निवडणुकीपूर्वी दाखविण्यात आले होते. आता पुन्हा मनपाची निवडणूक आली, पण प्रकल्प पुढे सरकलाच नाही. उलट अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या परिसरात लोकमत चमूने पाहणी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. दीड वर्षापासून सिमेंट रोडची कामे ठप्प आहेत. चार पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अजूनही अर्धवट आहे. पावसाळी नाल्या बांधकामाला फक्त सुरुवात झाली. आता काम ठप्पच आहे. यामुळे जागोजागी पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यूचे हॉटस्पाट झाले आहेत. लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
क्षेत्राधिष्ठित विकास या घटकाखाली डीपीआर तयार केला आहे. यात विविध प्रकारच्या २४ प्रकल्पांचा समावेश आहे. यावर ८७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु पाच वर्षे झाली तरी एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही.
...
सिमेंट रोडचे काम ठप्प
भरतवाडा चौक ते कळमनादरम्यान सिमेंटच्या कामाला दोन वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली. परंतु दीड वर्षापासून काम ठप्प आहे. अशीच अवस्था वीटभट्टीकडून अभिलाषा अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रोडची आहे. कोरोना संक्रमण कमी झाल्यानंतरही या कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे आजूबाजूच्या वस्त्यालगत पाणी साचले आहे. लोकांना ये-जा करता येत नाही. अपघाताचा धोका वाढला आहे.
...जोड आहे....