८५ कोटींच्या प्रस्तावित निधीतून १७ हेक्टर क्षेत्रात महाराजबागेचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:28 PM2021-05-11T23:28:13+5:302021-05-11T23:31:40+5:30
Development of Maharajbag १२५ वर्षे जुने असलेले आणि नागपूरच्या ऐतिहासिक वारशात भर घालणाऱ्या महाराजबागेचा भविष्यात विकास होण्याची आशा बळावली आहे. महाराजबाग व्यवस्थापनाने पाठविलेल्या ८५ कोटी रुपयांच्या प्रस्ताविक आराखड्याला केंद्रीय महाराजबाग प्राधिकरणाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. आता सरकारकडून यासाठी निधीची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १२५ वर्षे जुने असलेले आणि नागपूरच्या ऐतिहासिक वारशात भर घालणाऱ्या महाराजबागेचा भविष्यात विकास होण्याची आशा बळावली आहे. महाराजबाग व्यवस्थापनाने पाठविलेल्या ८५ कोटी रुपयांच्या प्रस्ताविक आराखड्याला केंद्रीय महाराजबाग प्राधिकरणाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. आता सरकारकडून यासाठी निधीची प्रतीक्षा आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची अलीकडेच या आराखड्याला मान्यता मिळाली आहे. महाराजबागेच्या विकासासाठी २०११ पासून सातत्याने शासनाकडे प्रस्ताव पाठविले जात आहे. मागील वर्षी पुन्हा नव्याने सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने आता मुख्य अडथळा दूर झाला आहे. शासनाने प्रस्ताव स्वीकारून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हा निधी नक्की कोणत्या विभागाकडून मिळणार हे स्पष्ट नसले तरी पर्यटन किंवा नगरविकास विभागाकडून किंवा डीपीसीकडून विशेष निधी म्हणून यासाठी निधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या असलेल्या महाराजबागेतील प्राणिसंग्रहालय ९ हेक्टरमध्ये आहे. महाराजबागेचा प्रस्तावित विकास आराखडा १७ हेक्टर क्षेत्रासाठी आहे. निधीच्या उपलब्धतेनंतर विकासकार्यादरम्यान अनुसूची १ आणि २ मध्ये येणाऱ्या प्राण्यांच्या पिंजऱ्यांसाठी प्रस्ताव तयार करावा लागार आहे. त्यासाठी वेगळी डिझाइन, अंदाजपत्रक केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहे.
असे असेल उद्याचे महाराजबाग प्राणिसंग्रहालय
शहराच्या मध्यवर्ती भागातील या प्राणिसंग्रहालयात नव्या नियमानुसार (मॉडर्न झू कन्सेप्ट) बदल झालेले असतील. सध्याचे प्राणिसंग्रहालय १२५ वर्षे जुने असल्याने नव्या नियमांशी सुसंगत नाही. पर्यटकांच्या दृष्टीने सुविधांवर भर दिला जाईल. प्रसाधनगृह, कॉफी शॉप, नव्या पाऊलवाटा तयार केल्या जातील. सुरक्षा भिंती बांधून प्राण्यांसाठी नवे पिंजरे येतील. जुन्या पिंजऱ्यांचे नूतनीकरण केले जाईल. वन्यजीव अध्ययन, संवर्धन-संरक्षण कार्यक्रम अद्ययावत केला जाईल. सुरक्षा व्यवस्था अद्ययावत आणि मजबूत होईल. प्राण्यांची वैद्यकीय सुरक्षा, सांडपाणी, वीज, पाणीपुवठा असे प्रस्तावित बदल आहेत.
प्रथमच भरीव निधीची अपेक्षा
यापूर्वी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने थोडाफार निधी दिला. मात्र, भरीव निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल. केवळ पर्यटकांच्या भरवशावर चालणारे हे देशातील एकमेव प्राणिसंग्रहालय असल्याने या प्राणिसंग्रहालयापुढे बऱ्याच आर्थिक अडचणी आहेत. याचे व्यवस्थापन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आहे.
नागपूरकरांच्या आस्थेचे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले हे जुने पर्यटन स्थळ आहे. सरकारने आराखडा स्वीकारून निधी दिल्यास नागपूरच्या वैभवात भर पडेल. प्राणी, प्रक्षेत्र आणि पर्यटक अशा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रस्ताविक आराखड्यात समावेश केला आहे.
- डॉ. सुनील बावसकर, महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रभारी अधिकारी