नागपूर शहराचा विकासच झाला नाही : नाना पटोले यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 01:19 AM2019-03-17T01:19:13+5:302019-03-17T01:19:58+5:30
महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. परंतु नागरिकांच्या हिताचे निर्णय न घेता महापालिकेने मालमत्ता करात दहापट वाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा लादला आहे. जी विकासकामे सुरू आहे, ती जनतेला डोकेदुखी ठरत आहेत. नागपूर शहराचा हवा तसा विकासच झालेला नाही, असा दावा नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. परंतु नागरिकांच्या हिताचे निर्णय न घेता महापालिकेने मालमत्ता करात दहापट वाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा लादला आहे. जी विकासकामे सुरू आहे, ती जनतेला डोकेदुखी ठरत आहेत. नागपूर शहराचा हवा तसा विकासच झालेला नाही, असा दावा नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला.
शनिवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. शहरात डांबरी रस्ते खोदून सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु या रस्त्यांमुळे पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या घरात पाणी जाते. महापालिकेतील विकास कामे खासगी कंपन्यांना देण्यात आलेली आहेत. शहरात सिमेंटच्या रस्त्यांची काय आवश्यकता होती, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मिहानमध्ये उद्योग आलेले नाही. बाबा रामदेव यांना जमीन दिली, पण उद्योग उभा झालेला नाही. मेट्रो प्रकल्पाला तर महापालिकेची हजारो कोटींची जमीन देण्यात आली असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. नागपूर शहराच्या विकासकामांमध्ये झालेल्या खर्च व एकूण निधीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
नरेंद्र मोदी गुजरातचे असूनही वाराणसी येथून निवडणूक लढवू शकतात. मी तर विदर्भातील आहे. येथील मतदारही आहे. मी बाहेरचा उमेदवार म्हणणे चुकीचे आहे. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्याचे पटोले म्हणाले. भाजपच्या सत्ता काळात देशात शेतकरी व लहान व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असेदेखील ते म्हणाले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, अॅड.अभिजित वंजारी, प्रफुल्ल गुडधे, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
प्रियंका गांधी यांची नागपुरात सभा
प्रियंका नागपूर - लोकसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या पियंका गांधी यांची ४ किंवा ६ एप्रिलला नागपुरात प्रचार सभा होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.