नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:13 PM2018-07-28T23:13:34+5:302018-07-28T23:14:38+5:30

नागपूरचा विकास म्हणजे संपूर्ण विदर्भाचा विकास नाही. विदर्भ मागासलेला आहेच. परंतु पश्चिम विदर्भ हा त्यातही मागसलेला आहे. त्यामुळे विकास कामे होत असताना पश्चिम विदर्भाकडेही लक्ष द्या. अन्यथा उद्या स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर पश्चिम विदर्भातील नागरिक विकास होत नाही म्हणून स्वतंत्र राज्याची मागणी करण्यासाठी पुढे येतील, असा इशारा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी येथे दिला.

The development of Nagpur is not the development of Vidarbha | नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे

नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे

Next
ठळक मुद्देजनमंच जनसंवाद : संजय खडक्कार यांनी मांडली कैफियत पश्चिम विदर्भाची

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचा विकास म्हणजे संपूर्ण विदर्भाचा विकास नाही. विदर्भ मागासलेला आहेच. परंतु पश्चिम विदर्भ हा त्यातही मागसलेला आहे. त्यामुळे विकास कामे होत असताना पश्चिम विदर्भाकडेही लक्ष द्या. अन्यथा उद्या स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर पश्चिम विदर्भातील नागरिक विकास होत नाही म्हणून स्वतंत्र राज्याची मागणी करण्यासाठी पुढे येतील, असा इशारा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी येथे दिला.
जनमंच जनसंवाद या कार्यक्रमांतर्गत शनिवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह शंकरनगर चौक येथे ‘कैफियत पश्चिम विदर्भाची’ या विषयावर डॉ. खडक्कार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे पश्चिम विदर्भ हा महाराष्ट्राच्या तुलनेतच नव्हे तर पूर्व विदर्भाच्या तुलनेतही कसा माघारलेला आहे, याची आकडेवारीच सादर केली.
अध्यक्षस्थानी जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील होते तसेच नरेश क्षीरसागर व्यासपीठावर होते.
डॉ. संजय खडक्कार यांनी सांगितले की, विदर्भ हा पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागात विभागलेला आहे. भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येचा विचार केला तर दोन्ही विभाग जवळपास सारखेच आहेत. परंतु दोन्ही विभागातील विकासात प्रचंड असमतोलपणा आहे. सिंचनाचेच क्षेत्र घेतले तर कृषी उत्पादन घेणाऱ्या जमिनीचे क्षेत्र हे पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भात जास्त आहे. मात्र त्यातुलनेत सिंचन कमी आहे. एकट्या पश्चिम विदर्भातच २ लाख ५४ हजार ४१२ कृषिपंपांचा बॅकलॉग आहे. रस्ते निर्मिती, वीज वापर या सर्वांच्या तुलनेत पश्चिम विदर्भ मागे आहे. सेझ नागपूर विभागात दोन असून अमरावती विभागात एकही नाही. आयटी पार्क नागपुरात पाच आहेत तर अमरावती विभागात एकही नाही. नागपूर विभागात अडीच लाख लोकांना रोजगार मिळतो तर अमरावती विभागात केवळ १ लाख १४ हजार लोकांनाच रोजगार मिळतो. नागपूर विभागातील गुंतवणूक ही १५ हजार कोटी आहे तर अमरावती विभागातील गुंतवणूक ही केवळ ७ हजार कोटी आहे. मेडिकलच्या एकूण १२०० जागांपैकी ९०० जागा नागपूर विभागात तर केवळ ३०० जागा अमरावती विभागात आहेत.
जे नागपूर विभागाला मिळत आहे तेच अमरावती विभागाला मिळावे, असा अट्टाहास नाही. पण विकास कामे होत असताना आम्ही मागासलेलेच आहोत, अशी भावना पश्चिम विदर्भातील लोकांमध्ये निर्माण होऊ नये. याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अमिताभ पावडे यांनी भूमिका विशद केली. संचालन सुहास खांडेकर यांनी केले. धनंजय मिश्रा यांनी परिचय करून दिला.
विदर्भाच्या चळवळीचे राजकीयकरण होऊ नये - शरद पाटील
विदर्भाची चळवळ मजबूत करायची असेल तर पश्चिम विदर्भातील लोकांना सोबत घेण्याची गरज आहे. आज पश्चिम विदर्भाच्या प्रश्नावर कुणी बोलतच नाही. खारपानसारखा महत्त्वाचा प्रश्न कुणी मांडत नाही. माझा राजकारणाला विरोध नाही. पण चळवळीचे राजकीयकरण नको. एखाद्या चळवळीचे राजकीयकरण झाले तर ती चळवळ संपते. म्हणून विदर्भाच्या चळवळीचे राजकीयकरण होऊ नये, असे माझे प्रामाणिक मत आहे. स्वतंत्र विदर्भ हवा असेल तर रणनीती बदला, पश्चिम विदर्भातील लोकांना सोबत घ्या आणि राजकारण सोडा, असे आवाहन जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी विदर्भवादी संघटनांना केले.

 

 

Web Title: The development of Nagpur is not the development of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.