नागपूरच्या विकासावर आज महामंथन
By admin | Published: September 11, 2016 01:56 AM2016-09-11T01:56:55+5:302016-09-11T01:56:55+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाने घेतलेल्या पुढाकारातून महापालिका व नासुप्रशी संबंधित प्रश्नांवर एका मंचावर एकत्रितपणे चर्चा होणार आहे.
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाने घेतलेल्या पुढाकारातून महापालिका व नासुप्रशी संबंधित प्रश्नांवर एका मंचावर एकत्रितपणे चर्चा होणार आहे. नागपूरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. या चर्चेत नागपूरच्या एकूणच प्रश्नांवर सखोल विचारमंथन होऊन उपाय योजनांचे अमृत बाहेर बाहेर पडेल व यातून नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास हजारो नागपूरकरांनी व्यक्त केला आहे.
आज रविवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता कामठी रोडस्थित ईडन ग्रीन्ज येथे आयोजित या एकदिवसीय महाचर्चेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. दुपारी ४ वाजता आयोजित समारोप सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील.
एकूण चार सत्रात नागपूर शहरातील नागरी प्रश्न, समस्या, योजनाबद्ध विकासाची आवश्यकता, नागपूर मेट्रो व पायाभूत विकास, भविष्यातील आव्हाने, मनपा-नासुप्र व नागरिकांची जबाबदारी आदी विषयांवर चर्चा होईल. लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ मार्गदर्शक, उद्योगपती यांच्यासह मान्यवर शहरातील विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करून उपाय सुचवतील. आॅरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) च्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
नागपूरकर एकीकडे मेट्रो रेल्वे, स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहत आहेत तर दुसरीकडे रस्ते, पाणी, गटार, स्वच्छता, उद्यान, झोपडपट्टी, पार्किंग, सार्वजनिक परिवहन व्यवस्था, सार्वजनिक शौचालय यासारखे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत.
लोकमतने जनतेच्या मनातील हे प्रश्न ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन २०२० (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)’ या महाचर्चेच्या माध्यमातून मांडण्याची घोषणा केली तेव्हा नागपूरकरांनी लोकमतचे भरभरून कौतुक केले.
हजारोंच्या संख्येने लोकमतला ई-मेल, व्हॉट्स अॅप, फोन करून तसेच पत्राद्वारे आपल्या समस्या मांडल्या व सूचनाही केल्या. जनतेने मांडलेल्या या प्रश्नांवर लोकमतच्या महाचर्चेत सखोल मंथन होणार असून या प्रश्नांचे समाधान शोधण्याचा प्रयत्नही होणार आहे. लोकमत खऱ्या अर्थाने जनतेचा आवाज बुलंद करणार आहे.