मूलभूत सुविधांसाठी १०० कोटींचा विकास आराखडा

By Admin | Published: July 11, 2017 02:01 AM2017-07-11T02:01:04+5:302017-07-11T02:01:04+5:30

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानतर्फे पिण्याचे पाणी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात..

Development plan of 100 crores for basic facilities | मूलभूत सुविधांसाठी १०० कोटींचा विकास आराखडा

मूलभूत सुविधांसाठी १०० कोटींचा विकास आराखडा

googlenewsNext

जिल्हा खनिज प्रतिष्ठान : दोन वर्षीय विकास आराखड्याला मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानतर्फे पिण्याचे पाणी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा दोन वर्षीय विकास आराखड्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खनिज प्रतिष्ठान समन्वय समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नागपूर जिल्हा खनिज प्रतिष्ठान समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, अ‍ॅड. अनिल किलोर, कौस्तुभ सुधीर दिवे, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीराम कडू, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील तसेच समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील खनिज संपत्तीपासून मिळणारा निधी जिल्ह्यातील विकासासाठी वापरता यावा, यासाठी खनिज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी याअंतर्गत ६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बाधित क्षेत्र व अबाधित क्षेत्रासाठी एकत्रपणे मिळणाऱ्या निधीअंतर्गत जिल्ह्यात विविध अत्यावश्यक सुविधांसाठी हा निधी वितरित करावयाचा असल्याने, दोन वर्षांचा एकत्र आराखडा तयार करून सोमवारी झालेल्या बैठकीत १०० कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील विविध वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेसाठी शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार तरतूद करण्यात आली असून, प्रत्येक विभागाने विभागप्रमुखामार्फतच प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठानासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीसंदर्भात माहिती दिली. जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीराम कडू यांनी प्रास्ताविक केले.

असा आहे
विकास आराखडा
ग्रामीण भागात शुद्ध
पिण्याचे पाणी : १० कोटी रुपये
पर्यावरण संवर्धन : ५ कोटी रुपये
आरोग्य केंद्रात कर्करोग तपासणीसह अत्यावश्यक सुविधा : १० कोटी रुपये
शाळा डिजिटल : १० कोटी
महिला व बाल कल्याण योजनांतर्गत सुविधा : ३ कोटी
वरिष्ठ नागरिक व विकलांगासाठी रोजगाराचा संधी : ५ कोटी रुपये
कौशल्य विकास अंतर्गत अत्याधुनिक यंत्रसामुग्री :
२.५० कोटी
ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना व स्वच्छता राखणे :
१० कोटी
ग्रामीण भागातील पांधण रस्ते दुरुस्ती : १५ कोटी रुपये
महसूल ग्राम विकास विभागाचे डिजिटलायजेशन :
२.५० कोटी रुपये
तालुका स्तरावरील क्रीडा संकुलामध्ये आवश्यक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना साहाय्य : ५ कोटी रुपये
उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये सोलर व्यवस्था डिजिटल वार्तालय तसेच ग्रामीण भागातील रस्ते विकास : १८ कोटी रुपये

विविध विकास कामांचा आराखडा
पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी आमदार सुधाकरराव देशमुख, महापौर नंदा जिचकार, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके तसेच नागपूर सुधार प्रन्यास महानगरपालिका व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
छावणी येथील दुर्गा माता मंदिर संस्थांनचा विकास, टायगर गॅप ग्राऊंड येथील आदिवासींना पर्यायी जागा, हजारी पहाड येथील रस्त्यांचे रुंदीकरण, सीताबर्डी येथील हॉकर्सला पर्यायी जागा याचा बैठकीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेऊन तात्काळ प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्यात.

Web Title: Development plan of 100 crores for basic facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.