३४ हजार कोटींचा विकास आराखडा
By Admin | Published: May 12, 2015 02:21 AM2015-05-12T02:21:59+5:302015-05-12T02:21:59+5:30
नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१३ मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार
महापालिका : सुधारित आराखडा मंजुरीसाठी सभेत मांडणार
नागपूर : नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१३ मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०४१ सालापर्यंतचा ३४,६०४ कोटीचा सुधारित शहर विकास आराखडा तयार केला आहे. १८ मे रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तो मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
सध्याची परिस्थिती व भविष्यातील गरजांचा विचार करून शहराचा विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या साहाय्याने मे.क्रिसील रिस्क अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लिमिटेड एजन्सीने हा आराखडा तयार केला आहे.
शहरी विकास तसेच शहरी रोजगार व दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाचा जवाहरलाल नेहरू नागरी पुनरु त्थान अभियान अंतर्गत शहराचा सुनियोजित विकास साधण्यासाठी २००६ मध्ये शहर विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या दृष्टीने विकासाचा प्रयत्न करण्यात आला.
केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने नागरी विकास क्षमता बांधणी हाती घेतली आहे. यासाठी भारतातील काही शहरांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात नागपूर शहराचा समावेश आहे. त्यानुसार २००६ मध्ये तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात सुधारणा करून २०४१ पर्यंतचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे.
हा आराखडा तयार करताना विविध सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, शासकीय व गैरशासकीय संस्थांचे अधिकारी, यांच्यासमक्ष आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होेते.(प्रतिनिधी)
अशी होईल विकास कामे
विभाग खर्च (कोटीत)
पाणीपुरवठा ६७१
सिवरेज व शौचालय १३६६
रस्ते व वाहतूक २२०५३
पावसाळी नाल्या ३६९२
कचऱ्यावर प्रक्रिया ३६८
झोपडपट्टी विकास ४८११
पुरातत्त्व विकास ५३४
पर्यटन विकास २०१
ई-गव्हर्नन्स १६०
सामाजिक उपक्रम १९४
पर्यावरण ४५७
आपत्ती निवारण ९५
दोन टप्प्यात
राबविणार आराखडा
सुधारित शहर विकास आराखडा २०४१ सालापर्यंतचा असला तरी नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तो दोन टप्प्यात राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २०२१ सालापर्यंत २७,३५० कोटी तर दीर्घ मुदतीत २०४१ पर्यत ३४६०४ कोटीचा भांडवली गुंतवणुकीचा आराखडा तयार केला आहे.