सहकार्यानेच विकास शक्य
By admin | Published: May 7, 2015 02:18 AM2015-05-07T02:18:25+5:302015-05-07T02:18:25+5:30
देशाच्या विकासासाठी उद्योजक आणि कर विभागांमध्ये विश्वास अत्यावश्यक असल्याचे मत विदर्भ विभागाचे मुख्य अबकारी, सीमाशुल्क व सेवाकर आयुक्त एस.के. पांडा यांनी येथे व्यक्त केले.
नागपूर : देशाच्या विकासासाठी उद्योजक आणि कर विभागांमध्ये विश्वास अत्यावश्यक असल्याचे मत विदर्भ विभागाचे मुख्य अबकारी, सीमाशुल्क व सेवाकर आयुक्त एस.के. पांडा यांनी येथे व्यक्त केले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या नेतृत्वात संपूर्ण ट्रेड अॅण्ड इंडस्ट्री असोसिएशन, इन्स्टिट्यूशन आॅफ चार्टर्ड अकाऊन्टंट, कॉस्ट अकाऊन्टंट अॅण्ड कंपनी सेक्रेटरीच्या सहकार्याने संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये करण्यात आले. अध्यक्षस्थानी एस.के. पांडा होते. मंचावर अबकारी, सीमाशुल्क व सेवाकर आयुक्त-२ आशिष चंदन, आयुक्त (अपील) सी.आर. मीना, आयुक्त (नाशिक) राजपाल शर्मा, आयसीएआयचे माजी अध्यक्ष अशोक चांडक, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, सचिव रोहित अग्रवाल, आयसीएआय नागपूरचे अध्यक्ष कीर्ती अग्रवाल, आयसीएसआय नागपूरचे अध्यक्ष मनीष राजवैद्य, आयसीएमएचे अध्यक्ष श्रीराम महांकालीवार, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कैलास जोगानी, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मयूर पंचमतिया आणि कस्टम हाऊस एजंट असोसिएशनचे (सीएचएए) अध्यक्ष सुधीर अग्रवाल होते.
पांडा म्हणाले की, विवादात्मक मुद्यांवर तोडगा निघण्यासाठी उद्योजक आणि अधिकाऱ्यांमध्ये सहकार्य आणि विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे. यासाठी कर विभागाने पुढाकार घेतला असून उद्योजकांनाही पुढे यावे. विभागातर्फे नेहमीच सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पांडा यांनी दिली. अशोक चांडक यांनी अधिकारी आणि उद्योजकांमध्ये संवाद घडवून आणला. केंद्रीय अबकारी आणि सेवाकर संदर्भातील विविध मुद्दे निकाली निघाले आहेत. अतुल पांडे म्हणाले, देशात जीएसटी लागू होत असून उद्योजक आणि कर विभागामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण असावे. प्रदीप खंडेलवाल म्हणाले, लघु व मध्यम उद्योजक सर्वाधिक महसूल आणि रोजगार देणारे असल्याने या उद्योजकांबद्दल विभागाचे नरमाईचे धोरण असावे. कैलास जोगानी म्हणाले, आयकर विभागाप्रमाणेच अबकारी व सीमाशुल्क विभागाने दंडावरील व्याजात कपात करावी. यावेळी विविध प्रश्नांना पांडा यांनी उत्तरे दिली. रोहित अग्रवाल यांनी समारोपीय भाषण दिले. व्हीआयएच्या टॅक्सेशन फोरमचे अध्यक्ष नरेश जखोटिया यांनी संचालन आणि आभार मानले. (प्रतिनिधी)