नागरिकांच्या सूचनेनुसारच ‘स्मार्ट सिटी’चा विकास
By admin | Published: October 4, 2015 03:16 AM2015-10-04T03:16:51+5:302015-10-04T03:16:51+5:30
नागपूरकरांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हे शहर राहण्याजोगे व्हावे यासाठी ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मनपाची कार्यशाळा : नगरसेवकांनी विचारले प्रश्न
नागपूर : नागपूरकरांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हे शहर राहण्याजोगे व्हावे यासाठी ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या विचारात घेऊनच स्मार्ट सिटीची आखणी केली जाईल. प्रत्येक भागाची गरज वेगवेगळी असू शकते. संतुलित व सुनियोजित विकास हीच स्मार्ट सिटीची मुख्य थीम असेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.
महापौर प्रवीण दटके यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची नगरसेवकांना माहिती करून देण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या नगर भवनात कार्यशाळा आयोजित केली. या वेळी स्मार्ट सिटी सोबतच अमृत, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान आदी योजनांच्या उद्देशांचीही माहिती देण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, आ. प्रकाश गजभिये, आयुक्त श्रावण हर्डीकर, बसपा गटनेते गौतम पाटील आदी उपस्थित होते. महापौर दटके म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पाशी नागरिकांना जोडण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. नगरसेवकांनी नागरिकापर्यंत या योजनेची माहिती पोहचवावी यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा स्मार्ट सिटीच्या व्हिजन डाक्युमेंटमध्ये समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त हर्डीकर यांनी पॉवर पॉर्इंट पे्रझेंटेशनच्या माध्यमातून योजनेची माहिती द्यावी. हर्डीकर म्हणाले, शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाख आहे. वाहनांची संख्या १२ लाख ५० हजार आहे. त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली नाही तर परिस्थिती चिंताजनक होईल. पार्किगच्या व्यवस्थेत सुधारणा करावी लागेल. पर्यटनाच्या दृष्टीनेही येथे बरेच काही आहे. एज्युकेशन हब, मेडिकल हब म्हणूनही शहर विकसित होत आहे. त्यामुळे या प्रत्येक पैलूवर लक्ष केंद्रित करून पुढे जावे लागेल. कार्यक्रमात आ. प्रकाश गजभिये, अविनाश ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, असलम खान, राजू नागुलवार, किशोर गजभिये आदींनी स्मार्ट सिटी बाबत त्यांच्या संकल्पना मांडल्या. अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगांवकर यांनी स्वच्छ भारत मिशन बाबत माहिती दिली. (प्रतिनिधी)