प्रतिभावंतांच्या भरवशावरच विदर्भाचा विकास
By admin | Published: January 7, 2016 03:41 AM2016-01-07T03:41:26+5:302016-01-07T03:41:26+5:30
नागपूर-विदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक प्रतिभावंत आहेत. त्यांनी देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्धही केले आहे.
विंग कमांडर अजय गद्रे : सारथीचा पुरस्कार वितरण सोहळा
नागपूर : नागपूर-विदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक प्रतिभावंत आहेत. त्यांनी देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्धही केले आहे. पण आपल्या शहरात न मागता आपल्याला सन्मान मिळावा, यासारखा मोठा सन्मान नाही. कुणी तरी आपली दखल घेतो आहे, ही भावना बळ देणारी आहे. सारथी संस्थेने हे कार्य मागील २५ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. अशा प्रतिभावंतांच्या भरवशावरच विदर्भाचा विकास आणि उन्नती शक्य असल्याचे मत विंग कमांडर अजय गद्रे यांनी बुधवारी व्यक्त केले.
सारथी संस्थेच्यावतीने नागपूर-विदर्भातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर, सुरेश चांडक, अनिरुद्ध वझलवार, सारथीचे अध्यक्ष मधुकर आपटे, अॅड. राजेंद्र राठी, एस जी. देशपांडे, प्रशांत काळे उपस्थित होते. गद्रे म्हणाले, प्रतिभावंतांचा सत्कार त्यांच्या कार्यात अधिक उंची गाठण्यासाठी त्यांना ऊर्जा प्रदान करणारा असतो. त्यामुळेच सारथीचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. अर्थशास्त्र, उद्योग, कला, नृत्य, नाट्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांना सारथीच्यावतीने सन्मानित करण्यात येते, ही वेगळी घटना आहे. याप्रसंगी फणशीकर यांनी सारथीच्या २५ वर्षांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात मूर्तिकार श्रीराम इंगळे, जलतरणपटू प्रभाकर साठे, बुद्धिबळपटू स्वप्नील धोपारे, व्यावसायिक ए.के. गांधी, अरुण लखानी, कृषितज्ज्ञ सी.डी. मायी, ज्येष्ठ समाजसेवक आणि नेते अटलबहादूर सिंग यांचा अतिथींच्या हस्ते शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानचिन्हाने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्तींनी सारथीची प्रशंसा करून आपल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. संचालन प्रभा देऊस्कर यांनी तर आभार अॅड. राजेंद्र राठी यांनी मानले. (प्रतिनिधी)