Devendra Fadanvis: PM मोदी अन् CM एकनाथ शिंदे लवकरच एकत्र, फडणवीसांनी सांगितला महामार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 08:55 PM2022-07-05T20:55:38+5:302022-07-05T20:57:41+5:30
Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या.
नागपूर/ मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सोमवारी नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर, इतरही बंडखोर आमदार त्यांच्या मतदारसंघात गेले. नागपुरात, फडणवीसांच्या स्वागताला भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. नागपूर विमानतळावरून देवेंद्र फडणवीस यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. नागपूरकरांना आमच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलो असता प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक जमले आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आहे. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची मला जाणीव आहे. ती योग्य प्रकारे पार पडण्याचा संकल्प आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिका करताना, शिंदे-फडणवीस सरकारची आगामी वाटचालही त्यांनी सांगितली.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून तो सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने बैठक सुद्धा झाली. हा अहवाल वेळेत न्यायालयात सादर करण्याला प्राधान्य आहे. ओबीसी समाजाला त्यांचा हक्क लवकरात लवकर प्राप्त व्हावा, हाच उद्देश असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उदघाटन आम्ही करू, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उदघाटन आम्ही करू : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 5, 2022
दरम्यान, राज्यातील पूरस्थितीकडे आमचे पूर्ण लक्ष आहे. आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आम्ही घेतली आहे. मी स्वत: काल रायगड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सातत्याने सर्व यंत्रणांशी संपर्कात आहेत, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले आहे. गेल्या अडीच वर्षांत खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. नेमके कोण राज्य चालवत होते, तेच समजत नव्हते, अशी टीका करताना, सर्वोच्च न्यायालयात आम्ही योग्य ती बाजू मांडू. आम्ही योग्य काम केले असल्याने योग्य निकाल येईल. पण आता न्यायालयावर टिप्पणी करणे अयोग्य ठरेल. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.