Devendra Fadnavis : महाविकास आघाडीनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली; फडणवीसांनी डागले टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 13:07 IST2022-05-07T12:53:17+5:302022-05-07T13:07:13+5:30
विश्वासघाताचे राजकारण दोन वर्षांपासून सातत्याने तयार होत असल्याची टीका फडणवीसांनी केली.

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली; फडणवीसांनी डागले टीकास्त्र
नागपूर : ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खडे बोल सुनावले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत, हे दुर्दैवी आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाची कत्तल या सरकारनं केली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. ते ओबीसी मेळाव्यात बोलत होते.
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सरकारने ७ वेळा वेळ मागून साधा आयोगही गठीत केला नाही. इम्पेरिकल डेटा तयार केला नाही. कोर्टाने याबाबत निरीक्षण नोंदवले व या सरकारला वेळ देऊन तुम्ही ट्रिपल टेस्ट केली नाही असे म्हणत कलम स्थगित केले, असे फडणवीस म्हणाले.
या सरकारला न्यायालयाने झापले. राज्य सरकारने कुठला तरी डेटा घेतला व सादर केला. सर्वोच्च न्यायालय भडकले त्यांनी सांगितले की हा मुख्यमंत्री यांच्यासमोर दिला आहे. कोर्टाने नाकारले आणि निवडणूका लावायला सांगितले. विश्वासघाताचे राजकारण दोन वर्षांपासून सातत्याने तयार होत असल्याची टीका फडणवीसांनी केली.
'ओबीसी' भाजपचा डिएनए
'ओबीसी' हा भारतीय जनता पक्षाचा डिएनए आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. आज ज्या प्रकारे ओबीसींवर अन्याय होत आहे, महाज्योतीच्या माध्यमातून तयार केलेल्या स्ट्रक्चरला गालबोट लावले जात आहे. महाविकास आघाडीच्या मालकांना ओबीसींच्या हिताचं काही पडलेलं नाही. ते कधीच ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाही, हे रोज काहीतरी नवीन अडंगा टाकतील व बोट आपल्याकडे दाखवतील, असा आरोप फडणवीसांनी केला. यासह आरक्षण असो किंवा नसो २७ टक्के जागांवर ओबीसी उमदेवार देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी आघाडीला प्रयत्नांची शर्थ करून या सरकारचा ओबीसी विरोधी चेहरा उघडा पाडायचा आहे. ओबीसी समाजाच्या न्यायीक हक्काकरता भाजप लढा देईल, असेही ते म्हणाले.