देवेंद्र फडणवीस - चंद्रशेखर बावनकुळे यांची नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 01:59 PM2024-10-20T13:59:10+5:302024-10-20T13:59:49+5:30
तीनही नेत्यांमध्ये झाली तब्बल दोन तास प्रदीर्घ चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महायुतीचे जागा वाटत अंतिम टप्प्यात असून, लवकरच भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहचले. या तीनही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत विदर्भातील जागा वाटपासह उमेदवारांच्या नावांवर गडकरींची सहमती घेण्याचे प्रयत्न झाले. नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जागांवर गडकरींचा पगडा आहे. शिवाय गडकरींना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे येथील जागांसह उमेदवारांबाबत गडकरींचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी फडणवीस व बावनकुळे यांनी अंतिम चर्चा केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही चर्चा सुरू असताना भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर हेदेखील गडकरींच्या घरी पोहचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांच्या नावाबाबत गडकरींनी दोन्ही नेत्यांना काही जागांवर महत्त्वपूर्ण सूचनाही केल्याची माहिती आहे.
पदाधिकारी देवगिरीवर
भाजपचे माजी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यावरील निलंबन कारवाईमुळे नाराज भाजप पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेत सामूहिक राजीनामे दिले होते. या सर्व नाराज पदाधिकाऱ्यांना शनिवारी रात्री देवगिरीवर बोलावण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढली.