कोणी कितीही प्रयत्न केले, तरी माझे नाव मिटवता येणार नाही... फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोमणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 01:40 PM2022-04-05T13:40:26+5:302022-04-05T14:21:37+5:30
ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, मात्र या गोष्टीचा आनंद आहे की जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उद्घाटन करत आहेत, असाही टोमणा फडणवीसांनी ठाकरे सरकारला मारला.
नागपूर : समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे, त्यासाठी मला आनंद आहे. पण, त्याची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. घाईघाईने उदघाटन केलं तर रस्ता सुरू होऊ शकतो, पण त्या रस्त्याला महत्व आहे. त्यामुळं कामं पूर्ण करावी नंतर उद्घाटन करावं, मात्र कधीही उद्घाटन झालं तरी त्याच स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मे महिन्यात त्याचे उद्घाटन करण्याचे प्रस्तावित आहे. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाचे महत्व वाढले आहे. तर, दुसरीकडे या रस्त्याच्या श्रेयाचा वाद निर्माण झाला आहे. यावर व्यक्त होताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला. कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव समृद्धी महामार्गवरून कोणी मिटवू शकत नाही, हे माझं श्रेय नाही, जनतेने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली, त्यामुळं हे काम करू शकलो, असे फडणवीस म्हणाले.
ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, मात्र या गोष्टीचा आनंद आहे की जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उद्घाटन करत आहेत, असाही टोमणा फडणवीसांनी मारला.
दरम्यान, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. साधारणपणे मे महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगावजवळ वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पाहणी केली होती. तर, आता या महामार्गाच्या श्रेयावरून वाद निर्माण होऊ लागले असून फडणवीसांनी याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.