देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 09:17 PM2024-10-31T21:17:39+5:302024-10-31T21:18:16+5:30
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ते महायुतीत सहभागी होणार की काय या चर्चांना उधाण आले होते.
नागपूर :राज ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ते महायुतीत सहभागी होणार की काय या चर्चांना उधाण आले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेने अनेक जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. ते उमेदवार मागे घेणार नसल्यामुळे त्यांच्याशी बऱ्याच ठिकाणी थेट लढत होणार आहे. त्यामुळे सध्या तरी मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नागपुरात ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी महायुतीच्याविरोधात देखील उमेदवार उभे केले आहे. महायुतीत भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांसोबत रिपाईचा प्रामुख्याने समावेश आहे. मनसे सध्या महायुतीत नाही. एखाद दोन जागांवर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मदत अलायन्स करू शकतो. शिवडीच्या जागेबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. मनोज जरांगे पाटील दिवसातून तीन वेळा माझे नाव घेतात. मात्र ज्यांनी १९८२ पासून मराठा आरक्षण अडवून ठेवले त्यांच्याबद्दल ते काही बोलत नाही. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही, असे फडणवीस म्हणाले.