विरोधकांसाठी EVM जिंकले की चांगले, हारले की खराब; फडणवीसांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 11:25 AM2022-03-17T11:25:36+5:302022-03-17T12:25:09+5:30
नागपूर विमानतळापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढत जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
नागपूर : नुकत्याच पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पाच पैकी चार राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. या यशाचा जल्लोष करत आज नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आज (दि. १७) नागपूर विमानतळाच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विमानतळापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढत, घोषणा देत कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार स्वागत केले. विमानतळ ते गडकरींच्या निवासस्थानापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी लोकमतशी संवाद साधताना, आम्ही कुठल्याही यशाने हुरळून जात नाही, यश ही जबाबदारी असते अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी यावेळी दिली.
यासोबतच, विरोधक हारले की ईव्हीएम खराब, जिकंले की चांगली असे त्यांचे धोरण आहे, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला. तर, जतनेनं ज्याप्रकारे पंतप्रधान मोदींवर आणि पक्षावर विश्वास दाखविला यानंतर आमची जबाबदारी वाढली असून येणाऱ्या महानगरपालिक निवडणूक असो, जिल्हा परिषद निवडणुका असो कि २०२४ सालच्या महाराष्ट्रातील निवडणुका असो, भाजप स्वबळावर जिंकेल असेही फडणवीस म्हणाले.