देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते; उद्धव ठाकरेंनी कर्नाटक सरकारबाबत भूमिका स्पष्ट करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 07:47 PM2023-06-16T19:47:40+5:302023-06-16T19:48:31+5:30
Nagpur News कुणी काहीही म्हणत असले तरी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते आहेत आणि २०१४ आणि २०१९ मध्ये ते सिद्ध झाले आहे, असे बावनकुळे म्हणाले.
नागपूर : वर्तमानपत्रांतील शिंदे-फडणवीस सरकारबाबतच्या सर्वेक्षणाच्या जाहिरातीवरून राजकारण तापले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत यावर वक्तव्य केले आहे. कुणी काहीही म्हणत असले तरी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये ते सिद्ध झाले आहे, असे बावनकुळे म्हणाले. नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगल्भ नेते असून त्यांना महाराष्ट्राचा हित कळते. त्यामुळे ते लहान सहान गोष्टींना थारा देणार नाहीत असे बावनकुळे म्हणाले. कर्नाटक सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातील धडा काढून टाकला आहे तर लवकरच गोहत्या बंदी कायदा रद्द केला जाणार आहे. कॉंग्रेसला मत अराजकता निर्माण करणारे आहे. कर्नाटक मध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे प्रतिपादनदेखील बावनकुळे यांनी केले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जे विधान केले आहे ते त्यांचे व्यक्तिगत विधान आहे. उद्धव ठाकरे साठी आता आमचे दार बंद आहे. आम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बीआरएस मॉडेलच्या चुका समोर आणणार
भाजपचे दोन माजी आमदार फोडत नागपुरातून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणाऱ्या बीआरएस पक्षावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. तेलंगणा मधील बीआरएसच्या मॉडेल मध्ये किती चुका आहेत. त्याची एक चित्रफित आम्ही लवकरच सर्वांसमोर आणणार आहोत, असे ते म्हणाले.
आशीष देशमुख यांना निवडणूक लढायची नाही
माजी आमदार आशीष देशमुख यांनी राहुल गांधीवर टीका केली. यावरून नाना पटोले यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले. काँग्रेसमध्ये ओबीसींची बाजू मांडणे चुकीचे मानले जाते, मात्र भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान आहे. आशिष देशमुख यांनी ओबीसींचा मान नसल्याने कॉंग्रेस सोडली. त्यांना लोकसभा, विधानसभा निवडणूक लढायची नाही. तर भाजपमध्ये संघटनात्मक काम करायचे आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.