देशमुख, केदारांचा गड भेदण्यासाठी देवेंद्र फडणवीस मोहिमेवर
By कमलेश वानखेडे | Published: May 20, 2023 08:10 AM2023-05-20T08:10:00+5:302023-05-20T08:10:02+5:30
Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघाच्या तर माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघाच्या मोहिमेवर फडणवीस स्वत: निघाले आहेत.
कमलेश वानखेडे
नागपूर : राज्यात भाजपच्या जागा वाढवायच्या असतील तर आधी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या गडांना सुरुंग लावावा लागेल, याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच अभ्यास आहे. कदाचित म्हणूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघाच्या तर माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघाच्या मोहिमेवर फडणवीस स्वत: निघाले आहेत. फडणवीस यांनी शुक्रवारी दोन्ही मतदारसंघात शासकीय आढावा बैठका घेतल्या. एवढेच नव्हे तर दोन्ही ठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तनासाठी उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सन २०१४ च्या निवडणुकीत नागपूर शहर व जिल्ह्यात तब्बल १२पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या होत्या. फक्त सावनेरची ही एकमेव जागा काँग्रेसकडे राखण्यात सुनील केदार यांना यश आले होते. २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या. ग्रामीणमध्ये सावनेर, काटोल व उमरेड, तर शहरात उत्तर नागपूर व पश्चिम नागपूर अशा पाच जागा जिंकण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीला यश आले. आता २०२४ मध्ये भाजपला स्वबळावर सत्तेत यायचे असेल, तर काँग्रेस - राष्ट्रवादीचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे २०१४ची पुनरावृत्ती करण्यासाठी पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याच्या मोहिमेवर निघाले आहेत.
काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे तुरुंगात जावे लागले. तुरुंगातून बाहेर पडताच देशमुख यांनी आता आपण ताकदीने राज्यभर फिरणार असे सांगत फडणवीस यांच्यावर नेम साधला होता, तर सावनेरचे प्रतिनिधित्व करणारे सुनील केदार हेदेखील फडणवीस यांच्यावर नेम साधण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या निवडणुकीत फडणवीस यांनी सावनेर मतदारसंघात जाऊन भाजपसाठी सभा घेतली होती. पण, केदारांनी त्या सभेचे योग्यरीत्या भांडवल केले. देशमुख - केदार यांचे प्रस्थ मोडीत काढल्याशिवाय जिल्ह्यात भाजपची पकड मजबूत होऊ शकत नाही, हे फडणवीस यांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच फडणवीस यांनी या दोन मतदारसंघांवर विशेष फोकस केला आहे.
काटोल, सावनेरमध्ये भाजपचा चेहरा ठरेना
- काटोल व सावनेर या दोन मतदारसंघात टक्कर देणारा भाजपचा उमेदवार कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेतृत्व व दिशा नसल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते विखुरलेले आहेत. देशमुख - केदारांशी कोण पंगा घेणार, आपल्याला थोडीच विधानसभा लढायची आहे, अशा मानसिकतेत काही कार्यकर्ते आहेत. असेच सुरू राहिले, तर हे दोन्ही मतदारसंघ काबीज करणे भाजपसाठी कठीण आहे. त्यामुळेच या दोन्ही मतदारसंघात पक्ष व नेते ताकदीने सोबत आहेत, या लढ्याचे पालकत्व आपण स्वीकारू, असा संदेश देण्यासाठी पालकमंत्री फडणवीस या मतदारसंघामध्ये दाखल झाले आहेत.