कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही; दोषींना संरक्षण दिल्यास... फडणवीसांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 01:00 PM2022-04-21T13:00:43+5:302022-04-21T13:33:09+5:30

भाजपच्या पोलखोल रथाच्या यात्रेवर कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis on maha vikas aghadi over police transfer and polkhol yatra | कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही; दोषींना संरक्षण दिल्यास... फडणवीसांचा इशारा

कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही; दोषींना संरक्षण दिल्यास... फडणवीसांचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्दे विदर्भाची हवा चांगली; संजय राऊतांना सुबुद्धी येईल, फडणवीसांचा टोमणा

नागपूर : भाजपची पोलखोल यात्रा सुरू आहे. ज्यांची रोज पोलखोल होत आहे, ते अस्वस्थ झाले असून आमच्या रथावर हल्ले करत आहेत. पण, कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही. पोलिसांनी याप्रकरणी निष्पक्ष कारवाई करावी. पोलीस ज्या कुणाला संरक्षण देत आहेत त्यांनी ते थांबवावे अन्यथा त्यांचीदेखील पोलखोल करू असा इशारा फडणवीसांनी दिला. यासह अमरावती जिल्ह्यात झालेल्या दंगलीसंदर्भात फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली.

अमरावती दंगलप्रकरणी पोलिसांनी जात-धर्म न पाहता कारवाई करावी, असे फडणवीस म्हणाले. अमरावतीत इंग्रजांचे राज्य होते, तसे पोलीस राज सुरू असल्याची टीका त्यांनी केली. कुणाचे तरी लांगुलचालन सुरू असून दोन समाज एकमेकांसमोर उभे आहेत. पण दंगलीनंतर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी जात-धर्म न पाहता करावाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊतांना टोला

शिवसेना खासदार संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. हिंदुत्वाचा गड असलेल्या नागपुरात सेनेचा पाय भक्कम करायचा असल्याचे राऊत म्हणाले आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. नागपूरची हवा चांगली आहे, विदर्भातल्या मातीत एक वेगळेपण आहे. संजय राऊत वारंवार येथे आल्यास त्यांना सुबुद्धी येईल असे फडणवीस म्हणाले आहेत.

यासह काल काही पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश देण्यात आले व नंतर मागेही घेण्यात आले, वसुली रॅकेटमुळेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली का, त्याचं कारण समोर आलं पाहिजे, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. 

Web Title: devendra fadnavis on maha vikas aghadi over police transfer and polkhol yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.