अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता भीती निर्माण करण्याचं काम, शालेय अभ्यासक्रम बदलांवरील आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 11:58 AM2022-04-01T11:58:18+5:302022-04-01T12:27:00+5:30
अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली असून त्यातून अशी कवकवी येत, असेही फडणवीस म्हणाले.
नागपूर : देशातील विविध प्रकारच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भाजप मुलांच्या मनात विष पेरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जो काही अभ्यासक्रम आहे हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्यात वेळोवेळी तज्ज्ञांनी वेळोवेळी बदल केले आहेत. केवळ अल्पसंख्यांकाची मत मिळवण्याकरता, त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम, काही नेते करत आहेत, असे फडणवीस म्हणाले. नुकतंच, एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार, जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हा संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे. भाजप देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हणाले होते. यावर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी यावेळी शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली असून त्यातून अशी कवकवी येत, असेही फडणवीस म्हणाले.
जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय
नागपूरमधील विधीज्ञ सतीश उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, मला या प्रकरणाची काही कल्पना नाही, मी देखील माध्यमांमध्येच बघितलं आहे की, जमीनीच्या प्रकरणांमध्ये नागपूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मूळ तक्रार ही नागपूर पोलिसांची असून त्याच्याआधारे ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्यावर २००५ पासून विविध एफआयआर दाखल आहेत. त्यांना न्यायाधिशांची खोटी तक्रार केल्याप्रकरणीही शिक्षा झालेली आहे. त्यामुळे, जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय, असेही फडणवीस म्हणाले.