आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंची पळता भुई थोडी होईल, देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार
By योगेश पांडे | Published: April 4, 2023 05:02 PM2023-04-04T17:02:38+5:302023-04-04T17:03:22+5:30
जो चुकीचे काम करेल त्याला तुरुंगात टाकणार - फडणवीस
नागपूर : शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजिनाम्याची मागणी करताच राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरून फडणवीसदेखील आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अडीच वर्षांच्या काळात ज्यांनी घरी बसून काम केले त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असे नाही. जर आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. फडणवीस मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. दोन दोन मंत्री तुरुंगात गेल्यावरदेखील त्यांचा राजिनामा घेण्याची हिंमत ज्यांनी दाखविली नाही, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही. ज्यांच्या काळात पोलीस खंडणीबाज झाले त्यांना बोलण्याचा अधिकारच काय असा सवाल फडणवीस यांनी केला.
मी राज्याचा गृहमंत्री असल्याने अनेक लोकांना अडचण होत असून ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत. मला गृहमंत्रीपद कसे सोडावे लागेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मी कुठल्याही स्थितीत हे पद सोडणार नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असून जो चुकीचे काम करेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही घटनेची निष्पक्ष चौकशी आमचे सरकार करेल. पण त्याचे राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करू नये. कुणी चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
मी नागपुरकर, ठाकरेंहून खालची भाषा येते
त्यांचा जो थयथयाट आहे त्याला उत्तर देण्याचे कारणच नाही. पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून ते निवडून आले व त्यानंतर खुर्चीसाठी लाळघोटेपणा केला. खरा फडतूस कोण हे सर्वांनाच माहिती आहे. मी नागपुरचा आहे. ते ज्या भाषेत बोलले त्याहून खालची भाषा मला येते. पण मी तसा बोलणार नाही. तशी बोलण्याची माझी पद्धत नाही. याचे उत्तर त्यांना जनताच देईल, असेदेखील फडणवीस म्हणाले. चाणक्य म्हणाले होते की ज्यावेळी राज्यातील चोर, डाकू, लुटेरे किंवा अपप्रवृत्तीचे लोक राजाविरोधात बोलतात तेव्हा समजावे की राजाने योग्य काम सुरू केले आहे. मी राजा नाही, पण तरीदेखील चाणक्य जे म्हणाले ते राज्यात आता खरे होत असल्याचे दिसून येत आहे, असा चिमटादेखील त्यांनी काढला.