देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये; नागपुरातील भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका
By योगेश पांडे | Published: June 5, 2024 09:50 PM2024-06-05T21:50:44+5:302024-06-05T21:51:16+5:30
फडणवीस यांनी बुधवारी याबाबत भूमिका मांडल्यावर त्यांच्या समर्थकांना धक्का बसला.
नागपूर : लोकसभा निवडणूकीत राज्यात भाजपच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी राजीनामा देण्याची भूमिका मांडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये व राज्यासाठी काम करत रहावे अशी मागणी केली आहे.
फडणवीस यांनी बुधवारी याबाबत भूमिका मांडल्यावर त्यांच्या समर्थकांना धक्का बसला. फडणवीस यांनी असे पाऊल उचलू नये अशी भूमिका आ.प्रवीण दटके, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मांडली. लोकसभा निवडणूकीचे निकाल अपेक्षित पद्धतीने आले नाही. मात्र केंद्रात नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात रालोआचे सरकार बनत आहे. कमी जागा आल्या ही केवळ फडणवीस यांची नव्हे तर सामूहिक जबाबदारी आहे. येत्या काळात विधानपरिषद, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वात या निवडणूका भाजपचे कार्यकर्ते जिंकून दाखवतील. आम्ही फडणवीस यांना राजीनामा न देण्याबाबत विनंती करू असे दटके यांनी सांगितले.