देवेंद्र फडणवीस सुषमा अंधारेंवर पहिल्यांदाच बोलले, थेट विधानसभेतच कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 09:27 AM2022-12-28T09:27:40+5:302022-12-28T09:28:24+5:30
सुषमा अंधारे यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर सुषमा अंधारेंनी महाप्रबोधन यात्रेतून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. सुषमा अंधारेंच्या भाषणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांवर त्या शाब्दीक हल्ले चढवत आहेत. त्यातच, भाजप समर्थकांनी सुषमा अंधारेंचे जुने व्हिडिओ काढत त्यांनी वारकरी आणि हिंदुंबद्दल अवमानजनक भाषा वापरल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली, आता, यावरुन थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सुषमा अंधारेंवर हल्लाबोल केला.
सुषमा अंधारे यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी, विधानसभा सभागृहात भाजप आमदार आक्रमक झाले होते. आमच्या श्रीकृष्णाबद्दल तुमच्या नेत्या बोलतात, पण तुम्ही त्याबद्दल काहीही बोलत नाही. तुम्ही मुग गिळून बसलेले आहात, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल केला. दरम्यान, फडणवीसांच्या या आक्रमक भाषणाला सुषमा अंधारे यांनी सोलापुरातून प्रत्युत्तर दिलं आहे.
अंधारेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
सुषमा अंधारेंनी फडणवीसांच्या आरोपांना सोलापुरातून प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस इतके अभ्यासू आहात, नाही नाही ते सर्व मुद्दे काढले होते. १३ वर्षे तुम्ही झोपला होतात का? आत्ता तुम्हाला हे सर्व सुचतंय का? तुम्हाला असं वाटतंय की, तुमच्या या जाळ्यात मी अडकेल, पण अजिबात नाही. यानंतरही मी चुकतेय असं वाटत असेल, तर मी पुन्हा एकदा सांगते की, भागवत संप्रदायाचा कुठलाही सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही. हे मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत, असे म्हणत सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर पलटवार केला.