"...तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते, पण पदाची लालसा आम्हाला नव्हती"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:28 PM2022-07-05T18:28:26+5:302022-07-05T18:43:20+5:30
राज्याच्या विकासाची गाडी रुळावरून खाली गेली होती, ती आम्ही परत रुळावर आणू असे सांगतानाच ही सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूर : आम्ही म्हटले असते, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते. पण, पदाची लालसा आम्हाला नव्हती. उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करू, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्तावसुद्धा मीच दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरल्याने मी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हे सरकार आपली टर्म पूर्ण करेल. आमची चिंता करू नका. आम्ही एकमेकांकडून घेणारे नाही तर एकमेकांना देणारे आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपुरात आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आज दुपारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, २०१९ ला जनतेने भाजप-शिवसेना युतीला निवडून दिले. पण आमचे बहुमत छद्मीपणे पळवण्यात आले व अनैसर्गिक आघाडी आकाराला आली. आमचे सरकार गेल्याचे मला दु:ख नव्हते, तर महाराष्ट्र विकासात माघारतोय, याचे दु:ख अधिक होते. शेतकर्यांचे, विकासाचे अनेक प्रकल्प थांबले होते. महाविकास आघाडीतील अंतर्विरोध दररोज दिसत होता. शिवसेनेसमोरचे प्रश्न तर मोठे होते. तसेच त्यांच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतल्याने अस्वस्थता अधिक होती. त्यातूनच शिवसेनेत उठाव झाला आणि आम्ही त्या उठावाला साथ दिली, असे फडणवीस म्हणाले.
गेली अडीच वर्ष ही सरकार रामभरोसे चालत होते. राज्यात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट होता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात जी विकासाची गाडी चालत होती त्याच इंजिन मध्येच बंद पडले आणि राज्याच्या विकासाची गाडी रुळावरून खाली गेली होती. यातून आम्हाला मार्ग काढायचा होता व त्यासाठी आम्ही संघर्ष केला. ही विकासाची गाडी आम्ही परत रुळावर आणणार असे सांगतानाच ही सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे, असेही फडणवीस म्हणाले.
राज्यात स्थापन झालेल्या नव्या सरकारला रिक्षावाल्याचं सरकार म्हणूल हिणवलं जात असल्याच्या प्रश्नावर उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं. ज्यांनी मोदीजींना चायवाला म्हणून हिणवलं त्याच आमच्या पंतप्रधानांनी आज विरोधकांना पाणी पाजले आहे. त्यामुळे कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे, असे फडणवीस म्हणाले.
वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत, असे फडणवीस म्हणाले.