पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार देणार : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 09:53 PM2018-01-15T21:53:33+5:302018-01-15T21:55:33+5:30
मिहान आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पुढील पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यात स्थानिक आणि विदर्भातील युवकांना प्राधान्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पुढील पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यात स्थानिक आणि विदर्भातील युवकांना प्राधान्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देशात बिस्किट आणि बेकरी उत्पादनात आघाडीच्या साज फूड प्रा.लि.च्या बिस्किट आणि बेकरी उत्पादने ब्रिस्क फार्मच्या देशातील बुटीबोरी येथील पाचव्या आणि पश्चिम भारतातील पहिल्या कारखान्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, आयुक्त अनुपकुमार आणि बुटीबोरीच्या सरपंच अनिता ठाकरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, भारतात बिस्किटांची जास्त मागणी आहे. येथील लोक बिस्किट खाणे आणि खाऊ घालणे पसंत करतात. पूर्व भारताप्रमाणेच पश्चिम आणि मध्य भारतात कंपनीचा विकास व विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे. कंपनी विस्तार करण्यास इच्छुक असेल तर सरकार सर्वतोपरी मदत करेल. स्थानिक एक हजार युवकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी कंपनीचे आभार मानले.
छत्तीसगडपेक्षा एमआयडीसीत वीज स्वस्त
मुख्यमंत्री म्हणाले, छत्तीसगडच्या तुलनेत एमआयडीसीमध्ये व्यावसायिक विजेचे दर कमी आहेत. त्याचा कंपनीला फायदा होईल. कंपनी लवकरच विस्तार करेल, अशी अपेक्षा आहे.
कंपनीचे चेअरमन के.डी.पॉल यांनी कंपनीच्या विस्तार योजनांची माहिती दिली. स्वागतपर भाषण कंपनीचे महाव्यवस्थापक मयंक चक्रवर्ती यांनी केले. यावेळी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.